तीन दिवसांआधी सोनं खरेदी न करण्याचं मोदींचं आवाहन; आज केंद्र सरकारचा सोनं-चांदीबाबत मोठा निर्णय
सोने चांदी आयात शुल्क: पुढील वर्षभर देशवासियांनी सोनं (Gold) खरेदी करू नये, तसंच पेट्रोल डिझेलचा (Petrol Diesel) वापरही कमीत कमी करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. तसंच शाळांनीही ऑनलाईन वर्ग सुरु करावेत असंही नरेंद्र मोदी म्हणाले. सलग दोन दिवस नरेंद्र मोदींनी देशवासियांना आवाहन केल्याने विविध चर्चा रंगल्या आहेत. याचदरम्यान, नरेंद्र मोदींच्या या आवाहनानंतर केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, या वाढीव किमती आजपासून लागू होणार आहेत.
सोने आणि चांदीच्या आयातशुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. सोने,चांदीवरील आयातशुल्क 6% वरुन 15% वर करण्यात आली आहे. आजपासूनच 15% आयातशुल्क लागू करण्यात आला आहे. सोने-चांदीची आयात रोखण्यासाठी केंद्र सरकारचे हे महत्वाचे पाऊल असल्याचं बोललं जात आहे. तसेच सोने आणि चांदीच्या 15 टक्क्यांच्या आयातशुल्कामधील 5 टक्के आयातशुल्क कृषी, विकास कामांवर खर्च होणार आहे.
आयात शुल्क वाढवल्यास काय परिणाम होईल? (Gold-Silver Marathi News)
सरकारने आयात शुल्क वाढवल्यास, मौल्यवान धातूंचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या देशात मागणी कमी होऊ शकते. तथापि, यामुळे भारताची व्यापार तूट कमी होण्यास मदत होऊ शकते आणि रुपयाला आधार मिळू शकतो, जो आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक आहे. भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा खरेदीदार आहे. देशात दरवर्षी अंदाजे 700-800 टन सोन्याचा वापर होतो, तर सोन्याचे उत्पादन केवळ 1-2 टन आहे. याचा अर्थ, भारत आपल्या सोन्याच्या गरजांपैकी सुमारे 90% गरजा पूर्ण करण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. सोन्याचे पैसे डॉलर्समध्ये दिले जातात. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी, भारताची सोन्याची आयात 72 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, जी 2025 च्या आर्थिक वर्षातील 58 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 24 टक्के वाढ आहे.
जर वर्षभर सोन्याची खरेदी न केल्या काय परिणाम होईल? (Gold-Silver Marathi News)
जर भारतीयांनी वर्षभर सोन्याची खरेदी कमी केली, तर सोन्याची आयात 30 ते 40 टक्क्यांनी कमी होऊ शकते. याचा अर्थ असा की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाचे पालन केल्यास अंदाजे 20-25 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते. सोन्याच्या आयातीत 50 टक्के घट झाल्यास 36 अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकते, जी चालू खात्यातील तुटीच्या जवळपास निम्मी आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, वर्षभर सोन्याची खरेदी टाळल्यास भारताच्या डॉलर बहिर्वाहात अब्जावधी डॉलर्सची थेट घट होऊ शकते.
नरेंद्र मोदींच्या आवाहनामागील मोठी कारणं- (why pm modi appeal for work from home and not to buy gold)
एकंदरीत पाहता, या सर्व घटकांमुळे सरकारवर आपला डॉलर साठा जपून ठेवण्याचा दबाव वाढला आहे. याचे कारण असे की, जेव्हा जेव्हा भारत वस्तूंची आयात करतो, उदा. तेल, वायू (गॅस), सोने किंवा खते तेव्हा त्याचे पेमेंट (पैसे) डॉलरमध्ये केले जाते. परिणामी, जेव्हा वस्तूंच्या किमती वाढतात, तेव्हा अधिक प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. यामुळे परकीय चलन साठ्यावर ताण येतो आणि रुपयाची स्थिती कमकुवत होते. नेमक्या याच कारणामुळे सरकार जनतेला अनावश्यक खर्च कमी करण्याचे आवाहन करत आहे. जसे की सोन्याची खरेदी करणे, इंधनाचा अतिवापर करणे किंवा परदेश प्रवास करणे. अशा उपाययोजनांमुळे डॉलरची बचत होईल आणि अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत मिळेल. पंतप्रधानांचे हे आवाहन एक ‘सावधगिरीचा उपाय’ म्हणून पाहिले जात आहे; जागतिक संकटाच्या काळात भारताच्या आर्थिक स्थितीचा समतोल राखण्यासाठी आणि भविष्यात येऊ शकणाऱ्या मोठ्या आर्थिक धक्क्यांपासून संरक्षण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
नरेंद्र मोदींनी देशाला कोणती आवाहनं केली? (Narendra Modi On Gold Petrol Diesel)
- सोन्याची खरेदी टाळा
- पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा
- वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
- परदेश प्रवास टाळा
- खाद्यतेलाचा वापर कमी करा
- नैसर्गिक शेतीचा अवलंब करा
- स्वदेशी उत्पादनं वापरा
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.