दुष्काळातही संधी… ठिबक सिंचनातून बहरली पेरूची बाग! अडीच एकरात मिळाले 12 लाखांचे उत्पन्न; राज्यपालांनी फोन करून केले शेतकऱ्याचे अभिनंदन

>> विनायक मोरे

दुष्काळ ही इष्टापत्ती आहे, या संधीचा व्यवस्थित उपयोग केल्यास नक्कीच फायदा होतो, हे औसा तालुक्यातील बाणेगाव येथील प्रगतिशील शेतकरी चंद्रकांत सोपान परिहार यांनी सिद्ध करून दाखवले. भयंकर दुष्काळी परिस्थितीत त्यांनी अडीच एकरातील पेरूची बाग ठिबक सिंचनाच्या मदतीने जगवली. परिहार यांनी नुसती बाग जगवलीच नाही, तर त्यातून १२ लाखांचे उत्पन्नही मिळवले. शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरणाऱ्या या उपक्रमाचे खुद्द राज्यपाल जिष्णु देव शर्मा यांनी खास कौतुक केले. शर्मा यांनी परिहार यांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले.

यंदा पावसाने जबरदस्त ओढ दिल्यामुळे औसा तालुक्यावर दुष्काळाची गडद पडछाया आहे. खरीप हातून गेला, रब्बीची आशा मावळली. त्यामुळे खायचे काय, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. दुष्काळी परिस्थितीशी दोन हात करताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. काही शेतकऱ्यांनी पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून बाहेरच्या राज्याची वाट धरली आहे. दुष्काळ हे संकट नसून ती इष्टापत्ती आहे हे ओळखून अनेक शेतकरी अजूनही तग धरून आहेत. त्यापैकीच एक बाणेगावचा परिहार परिवार!

आठ एकर शेती, अडीच एकरात पेरू

चंद्रकांत परिहार यांना आठ एकर शेती आहे. अमोल आणि विशाल ही त्यांची मुले अखंड शेतीत राबत असतात. अडीच एकरात त्यांनी तायवान पिंक जातीचा पेरू लावला आहे. आठ बाय आठ असा जागेचा वापर त्यासाठी केला. पेरूची बाग बहरात येण्याच्या काळातच पावसाने ओढ दिली. परंतु परिहार यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पेरूची बाग जगवली. गेल्या दीड वर्षात पेरूची दोनदा तोड करण्यात आली असून आता तिसरी तोड प्रतीक्षेत आहे. दोन तोडीतून परिहार यांना जवळपास १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. तिसऱ्या तोडीतूनही सहा लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे.

अभ्यास दौऱ्यांचा फायदा झाला

गेल्या दहा वर्षांपासून परिहार कुटुंब सेंद्रिय शेती करत आहे. शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात कशी वाढ होईल, याकडे चंद्रकांत परिहार यांनी स्वतः जातीने लक्ष दिले. यासाठी त्यांनी प्रगतिशील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. शेतीत करण्यात येणारे प्रयोग बघितले. ठिबक सिंचनाचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. त्यामुळेच भर दुष्काळात रक्ताचे पाणी करून वाढवलेली पेरूची बाग जगवता आली, असे परिहार म्हणाले. औसा येथीलच जावेद मुल्ला यांना पेरू उतरवण्याचे कंत्राट दिले असून आतापर्यंत २४ टन पेरू बाजारात गेला आहे. अजून किमान पाच ते सहा टन पेरू शिल्लक असल्याचे त्यांनी सांगितले.

निसर्गाचा विचार करूनच आता शेती केली पाहिजे. कधी अतिवृष्टी, कधी अवर्षण अशा दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांनी दुष्काळाला संकट न समजता संधी समजून शेती जगवावी. सेंद्रीय शेती हा सध्याच्या काळात सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

– चंद्रकांत परिहार, प्रगतिशील शेतकरी

राज्यपालांना पाठवली पेरूची पेटी

ठिबक सिंचनाचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने घेतलेल्या पेरूची पेटी चंद्रकांत परिहार यांनी राज्यपाल जिष्णु देव शर्मा यांना पाठवली. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, खासगी सचिव पवनसिंह तसेच डॉ. निशिकांत देशपांडे यांनी ही पेटी शर्मा यांना दिली. राज्यपालांनी फोन करून चंद्रकांत परिहार यांचे अभिनंदन केले, तसेच पेरूच्या चवीचेही कौतुक केले.

Comments are closed.