'गंगा एक्सप्रेस वे' चे भव्य उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पणाचा कार्यक्रम

अनेक वैशिष्ट्यांनी युक्त…

  • एकवीस राष्ट्रीय महामार्गांशी जोडणी असणारा अतिमहत्वाचा एक्स्प्रेसवे
  • दिल्ली-मेरठ-प्रयागराज प्रवास कालावधी अनेक तासांनी वाचविला जाणार
  • महामार्गांच्या या जाळ्याच्या क्षेत्रात उद्योग-व्यवसायांची मोठी वाढ शक्य
  • या महामार्गाच्या निर्मितीसाठीचा एकूण खर्च 36 हजार 230 कोटी रुपये
  • महामार्गात गंगा नदीवर आणि तिच्या उपनदीवर एकंतर दोन भव्य सेतू
  • अदानी बिल्डर्स आणि आयआरबीकडून निर्मिती, त्यांना 30 वर्षांचे अधिकार
  • दोन स्थानी टोल संकलित करण्याची व्यवस्था, टोलचा दर वाजवी असणार

वृत्तसंस्था/लखनौ (उत्तर प्रदेश)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील आतापर्यंतचा सर्वात लांब असणाऱ्या ‘गंगा एक्स्प्रेसवे’ या अतिवेगवान महामार्गाचे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे. या सहा पदरी महामार्गामुळे मेरठ आणि प्रयागराज ही दोन महानगरे जोडली जाणार असून या त्यांची लांबी 594 किलोमीटर इतकी आहे. या महामार्गामुळे या दोन शहरांमधील प्रवास आता केवळ 6 तासांमध्ये करता येणार आहे. सध्या या प्रवासाला किमान 10 तास लागतात. तसेच या महामार्गावर उद्योग आणि व्यवसाय यांच्या विकासालाही चालना मिळेल, अशी माहिती देण्यात आली.

बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महामार्गाचे उद्घाटन केले. याच महामार्गाला दिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवे बिजोली येथे जोडलेला असल्याने दिल्ली ते प्रयागराज हा प्रवासही अत्यंत वेगवान पद्धतीने आणि विनाथांबा करता येणार आहे. या दोन्ही महामार्गांना जोडणारा महामार्ग बिजोली येथे बनविण्यात आला आहे. या नव्या महामार्गावर कार्स किंवा चार चाकी वाहने अधिकतर 120 किलोमीटरच्या वेगाने चालविणे शक्य होणार आहे. या महामार्गनिर्मितीचा खर्च 36 हजार 230 कोटी रुपये इतका असून तो उत्तर प्रदेशाच्या महत्वाकांक्षी पायाभूत सुविधा कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विकसीत करण्यात आलेला आहे. हा सहा पदरी महामार्ग असल्याने मालवाहक वाहने आणि प्रवासी वाहने सहजगत्या धावू शकणार आहेत.

बारा जिल्ह्यांना लाभ

या महामार्गावर मेरठ, हापूर, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शहाजहानपूर, हार्दोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगढ आणि प्रयागराज हे 12 जिल्हे असल्याने त्यांना त्याचा मोठा लाभ होईल. या 12 जिल्ह्यांमधील 500 हून अधिक गावांचे स्वरुप या महामार्गामुळे पालटणार असून या गावांमध्ये आता नवे उद्योग येऊ शकतील. तसेच गावांमधील युवकांना रोजगाराच्या संधी मिळू शकणार आहेत.

21 महामार्गांशी जोडणी

या महामार्गाला सध्या अस्तित्वात असणारे 21 राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय महामार्ग जोडले गेले आहेत. त्यामुळे महामार्गांचे एक विस्तृत जाळेच निर्माण झाले असून त्यामुळे या सर्वच महामार्गांवरील वाहतुकीचा वेग वाढणार आहे. तसेच या जाळ्याच्या क्षेत्रात सध्या असणाऱ्या आणि भविष्यकाळात निर्माण होणार असलेल्या उद्योगांना मोठा लाभ होईल, असे तज्ञांचे मत आहे. या महामार्गाची प्रशंसा आंतरराष्ट्रीय स्तरावर केली जात आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विमानासाठी धावपट्टीचीही सोय

या महामार्गाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्या म्हणजे त्याच्यावर विमानेही उतरु शकणार आहेत. शहाजहानपूर या जिल्ह्यात या महामार्गाला लागूनच साडेतीन किलोमीटर लांबीची विमानांची धावपट्टीही निर्मिण्यात आली आहे. या महामार्गावर आणि या धावपट्टीवर भारतीय वायुदलाने आपली विमाने उतरविण्याचे परीक्षणही नुकतेच केले आहे. अशा प्रकारे या महामार्गाचा उपयोग आवश्यकता भासल्यास युद्धप्रसंगीही करता येणार आहे. प्रवासी विमानेही तातडीने उतरवायची असल्यास या धावपट्टीचा उपयोग करता येईल. हे या महामार्गाचे वैशिष्ट्या अजोड आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रशंसा

या महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. निर्धारित कालावधीच्या आधीच याचे निर्मितीकार्य पूर्ण करण्यात आल्याने निर्मितीखर्चही मोठ्या प्रमाणात वाचला आहे, याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या विक्रमी मतदानाचीही माहिती दिली. तेथील मतदार आता निर्भय झाल्यामुळे तो न भीता इतक्या मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडला आहे, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.

Comments are closed.