माळढोक पक्षी नष्ट होण्यापासून वाचला; वाळवंटात सापडली नवसंजीवनी, संवर्धनाला यश
दुर्मिळ मानल्या जाणाऱया आणि नामशेष होणाऱ्या ‘माळढोक’ या पक्ष्याला नवसंजीवन देण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या प्रकल्पाला मोठे यश मिळाले आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथील ‘डेझर्ट नॅशनल पार्क’मध्ये मानवी देखरेखीखाली अन् कृत्रिम गर्भधारणेद्वारे जन्मलेल्या दोन माळढोक पक्ष्यांना प्रथमच मुक्त नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले आहे.
एक काळ असा होता की पंजाबपासून थेट तामीळनाडूपर्यंत माळढोक पक्ष्यांचा संचार पहायला मिळायचा. परंतु कुरणांची झालेली प्रचंड धूप, अनियंत्रित शिकार आणि हाय-व्होल्टेज वीजवाहिन्यांचे जाळे यामुळे या पक्ष्यांची संख्या वेगाने घटली. आजच्या घडीला संपूर्ण देशभरात अवघे 150 पेक्षाही कमी माळढोक जिवंत उरले असून प्रामुख्याने राजस्थान आणि गुजरातच्या कच्छ भागातच त्यांचे अस्तित्व टिकून आहे. पर्यावरण तज्ञांच्या मते, माळढोक पक्ष्यांची समोर बघण्याची दृष्टी तुलनेने कमकुवत असल्याने आकाशात उडताना त्यांना उच्च दाबाच्या वीजवाहिन्या दिसत नाहीत आणि धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू होतो.
2016 मध्ये केंद्र सरकार आणि वन्यजीव संस्थेने रामदेवरा येथे माळढोक पैदास केंद्र सुरू केले होते. जून 2026 पर्यंत या केंद्रात पक्ष्यांची संख्या 98 पर्यंत पोहोचली असून त्यातील 38 पक्ष्यांचा जन्म कृत्रिम गर्भधारणेतून झाला आहे. नैसर्गिक वाळवंटात सोडण्यापूर्वी या पक्ष्यांना 9.25 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या विशेष टनेलमध्येच प्रशिक्षण देण्यात आले.
Comments are closed.