GTvsRCB: आयपीएल फायनल पावसामुळे रद्द झाल्यास कोण जिंकणार? 'हे' आहेत 3 नियम, अहमदाबादचे हवामानही घ्या जाणून

आयपीएल 2026 मध्ये आज (31 मे) हंगामातील शेवटचा आणि अंतिम सामना 2022 आणि 2025 हंगामाचे विजेते, गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाणार आहे. अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या या महत्त्वपूर्ण सामन्यात पाऊस झाला तर सामन्याचा निकाल काय असेल आणि त्यासाठी आयपीएलचे काय नियम आहेत, तसेच अहमदाबादचे हवामान कसे असेल, हे सर्व जाणून घेऊ.

अंतिम सामन्यावेळी पाऊस पडला, तर विजेता संघ निश्चित करण्यासाठी आयपीएलमध्ये तीन नियम आहेत. पहिला नियम षटकांची संख्या कमी करण्याशी संबंधित आहे. पावसामुळे सामन्यात व्यत्यय आला तर षटकांची संख्या कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा स्थितीत दोन्ही संघांना किमान पाच षटके खेळणे बंधनकारक असते.

दुसरा नियम असा की जर ठरलेल्या दिवशी अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला तर तो राखीव दिवशी खेळवला जातो, जेथे दोन्ही संघांना प्रत्येकी 120 मिनिटे दिली जातात. हे अगदी 1098 दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात घडल्याप्रमाणे आहे. तेव्हा 28 मे रोजीचा अंतिम सामना पावसामुळे रद्द झाला होता आणि तो 29 मे रोजी खेळवला गेला होता. यंदाही असे झाले तर सामना सोमवारी (1 जून) खेळला जाईल.

राखीव दिवशी सुद्दा सामन्याचा निकाल लागला नाही तर, विजेता कोण?
नियोजित किंवा राखीव दिवशी सामना पूर्ण न होऊ शकल्यास आयपीएलच्या नियमांनुसार त्याचा स्पष्ट निकाल दिला जातो. लीग टप्प्यांनंतर आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेला संघ विजेता घोषित केला जाईल. याचा अर्थ असा की, जर राखीव दिवशी सामना पूर्ण नाही झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2026 चा विजेता बनेल.

आता प्रश्न असा की अहमदाबादमध्ये नेमके वातावरण कसे?
AccuWeather.com याच्यानुसार, अहमदाबादमध्ये अंतिम सामन्याच्या दिवशी पावसाचे कोणतेही चिन्ह नाही. दिवसभर निरभ्र हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

समजा, हवामान बदलले आणि पाऊस झाला तर नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पाण्याचा निचरा करण्याची सुविधा उत्तम असल्याने २० मिनिटांनंतर सामना सहज खेळला जाऊ शकतो.

Comments are closed.