T20 Mumbai League – शार्दूल ठाकूरकडे ‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’च्या कर्णधारपदाची धुरा
‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’ संघाने आगामी टी-२० मुंबई लीग २०२६ साठी हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू शार्दूल ठाकूर याची कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली. मुंबई क्रिकेटमधील एक यशस्वी आणि अनुभवी खेळाडू म्हणून शार्दूल ठाकूरकडे दांडगा अनुभव आहे. त्याने भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारांमध्ये प्रतिनिधित्व केले असून विविध देशांतर्गत तसेच फ्रँचायझी स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्या अनुभवाचा संघाला निश्चितच फायदा होणार आहे.
गेल्या हंगामात ‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’चा प्रवास उपांत्य फेरीत थांबला होता. यंदा मात्र जेतेपद जिंकण्याच्या निर्धाराने संघ मैदानात उतरणार आहे. शार्दूलची कर्णधारपदी नियुक्ती ही त्याच रणनीतीचा भाग मानली जात आहे. संघाने अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधत एक भक्कम संघ उभारला आहे. भारताचे माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संघ आक्रमक क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
टी-२० मुंबई लीगमध्ये ‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’चे नेतृत्व करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. आमच्याकडे प्रतिभावान खेळाडू आणि अनुभवी प्रशिक्षक आहेत. आम्ही उत्तम तयारी, सकारात्मक क्रिकेट आणि सातत्यपूर्ण कामगिरी यावर भर देणार आहोत. संघात विजयाची संस्कृती निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे, असे शार्दूल ठाकूर म्हणाला.
दरम्यान, टी-२० मुंबई लीग २०२६ ही स्पर्धा १ जून ते १३ जून दरम्यान खेळवली जाणार असून ‘ईगल ठाणे स्ट्रायकर्स’चा पहिला सामना ‘वांद्रे ब्लास्टर्स’विरुद्ध होणार आहे.
ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा संघ –
शार्दूल ठाकूर (कर्णधार), आदित्य विनोद गिरी, अमर्त्य राजे, अनुज विनोद गिरी, अथर्व अंकोलेकर, अयान मोहित जैन, एकनाथ दिनेश केरकर, कार्तिक मिथिलेश मिश्रा, मनन भट, ओंकार तुकाराम तरमळे, रोहन राजेंद्र घाग, साईराज पाटील, शशिकांत एकनाथ कदम, शाश्वत योगेश जगताप, शॉन मोतीराम रॉड्रिग्ज, शिवांश लल्लन सिंग, सिद्धांत मनोज सिंग, सुमीर सम्राट झवेरी, विनय सुरेश कुंवर, धने पारेख.
Comments are closed.