आशियाई कुस्ती स्पर्धा – हिंदुस्थानला दोन सुवर्णांसह पाच पदके!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंदुस्थानच्या युवा रणरागिनींनी व्हिएतनाममध्ये सुरू असलेल्या १७ वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य अशा एकूण पाच पदकांची लयलूट करीत देशाचा तिरंगा डौलाने फडकावला.

दीक्षाने ४३ किलो गटात जबरदस्त वर्चस्व गाजवत सुवर्णपदक पटकावले. अंतिम कुस्तीत तिने किर्गिझस्तानच्या असांगारयेवा हिचा ६-० असा धुव्वा उडवला. यापूर्वीही तिने किर्गिझस्तानच्या प्रतिस्पर्धीला ८-०, तर यजमान व्हिएतनामच्या खेळाडूला १०-० अशा एकतर्फी फरकाने नमवत अंतिम फेरी गाठली होती.

७३ किलो वजनी गटात गरिमाने आक्रमक डावपेचांचे दर्शन घडवत मंगोलियाच्या नामुंतसेत्सेग बातबोल्ड हिला अंतिम लढतीत १८-६ असे पराभूत केले आणि हिंदुस्थानच्या खात्यात दुसरे सुवर्ण जमा केले.

या स्पर्धेत हिंदुस्थानला दोन रौप्यपदकेही मिळाली. ४९ किलो गटात निकिताला चीनच्या युआन युटिंगविरुद्ध अंतिम सामन्यात २-१० असा पराभव स्वीकारावा लागला. ६५ किलो गटात अंतराला चीनच्या सियू वेईकडून ०-५ अशी हार पत्करावी लागली. मात्र उपांत्य फेरीत जपानच्या बलाढ्य प्रतिस्पर्धीवर मिळवलेला तिचा विजय विशेष उल्लेखनीय ठरला.

५७ किलो गटात साक्षीने हिंदुस्थानसाठी कांस्यपदक जिंकले. उपांत्य फेरीतील निसटत्या पराभवानंतर तिने जबरदस्त पुनरागमन करत कझाकस्तानच्या अरिना कुआनिशोव्हाचा १०-० असा धुव्वा उडवला आणि पदकावर मोहोर उमटवली.

याआधी २३ वर्षांखालील आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानी मल्लांनी केलेल्या दमदार कामगिरीनंतर आता १७ वर्षांखालील महिला कुस्तीपटूंनीही आशियाई रंगमंच गाजवत कुस्तीमधील देशाची ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली.

Comments are closed.