गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात या 3 'प्लेयर बॅटल्स'वर असेल सर्वांचे लक्ष; रोहितला कोणत्या गोलंदाजापासून आहे धोका?

IPL 2026 च्या थरारामध्ये आज एक हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे, जेव्हा गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमने-सामने येतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात केवळ संघांमधील झुंजच नाही, तर काही जबरदस्त ‘प्लेयर बॅटल्स’वरही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असतील. IPL 2026 चा ३० वा सामना २० एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत ५ सामन्यांपैकी ३ विजयांसह ६ गुण मिळवले असून ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. हा संघ ६ सामन्यांत केवळ १ विजयासह १० व्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत गुजरात हा सामना जिंकून वरचे स्थान गाठण्याचा प्रयत्न करेल, तर मुंबई पुनरागमनाच्या शोधात असेल. पाहूया कोणत्या ३ ‘प्लेयर बॅटल्स’वर सर्वांचे लक्ष असेल…

​शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील लढत नेहमीच रंजक राहिली आहे. IPL मध्ये गिलने बुमराहविरुद्ध ८ डावांत केवळ ३४ धावा केल्या आहेत. बुमराहविरुद्ध त्याची सरासरी १७ असून तो २ वेळा बाद झाला आहे. त्यामुळे यावेळीही बुमराह गिलवर भारी पडू शकतो.

​गुजरातचा युवा सलामीवीर साई सुदर्शन आणि मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांच्यातही चुरशीची लढत पाहायला मिळेल. सुदर्शनने बोल्टविरुद्ध ५ डावांत ४३ धावा केल्या असून तो २ वेळा बाद झाला आहे. त्याची सरासरी २१.५ आहे, ज्यावरून ही लढत बरोबरीची होऊ शकते असे दिसते.

​मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मासमोर कगिसो रबाडाचे मोठे आव्हान असू शकते. रोहितने IPL मध्ये रबाडाविरुद्ध ७ डावांत ३८ धावा केल्या असून त्याची सरासरी १९ आहे आणि तो २ वेळा बाद झाला आहे. त्यामुळे रबाडा पुन्हा एकदा रोहितला अडचणीत आणू शकतो.

च्याGT वि MI हा सामना केवळ गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही, तर या मोठ्या ‘प्लेयर बॅटल्स’मुळे तो अत्यंत रोमांचक होणार आहे. विशेषतः रोहित शर्मावर असलेले रबाडाचे संकट आणि गिल-बुमराह यांच्यातील झुंज सामन्याची दिशा ठरवू शकते.

Comments are closed.