हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण, तुषार दामगुडेनं मारहाण केल्यानंतर पुणे पोलिसांचा निर्णय
Hanumant Pawar पुणे : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांनी संरक्षण दिलं आहे. पुण्यातील हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामुगडे आणि त्याच्या साथीदारांनी हनुमंत पवार यांना पुण्यातील स्वारगेट परिसरात एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर मारहाण केली होती. या प्रकरणाची राज्यभर चर्चा झाली होती. अखेर पुणे पोलिसांनी हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. एक गनमॅन पोलीस हनुमंत पवार यांच्यासोबत कायम असेल.
हनुमंत पवार यांना पोलीस संरक्षण
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण देण्यात आलं आहे. तुषार दामगुडे आणि साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचे प्रकरण दोन दिवसांपूर्वी घडलं होतं. त्या पार्श्वभूमीवर हनुमंत पवार यांच्या सोबत आता गनमॅन पोलीस तैनात असेल.
काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांनी तुषार दामगुडेला उत्तर देताना म्हटलं की काँग्रेसच्या विचारांचा पाईक असल्यानं प्रतिकार केला हिंसा केली नाही. मी शेतीमधला माणूस आहे, हे मराठवाड्यातील लोकांना माहिती असेल. मी गाई-गुरे राखलेला माणूस आहे. आम्ही बैलाला कोपराने बुक्की देऊन खाली बसवायचो. मी दामगुडेला एक बुक्की दिली असती तर तो पुन्हा उठू शकला नसता, असे हनुमंत पवार यांनी म्हटले. ते मंगळवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी काल हनुमंत पवार यांची भेट घेतली होती. ही भेट पुण्यातील काँग्रेस भवन येथे झाली होती.
23 फेब्रुवारी रोजी पुण्यातील एका दैनिकाच्या कार्यालयाबाहेर तुषार दामगुडे आणि त्याच्या साथीदारांनी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केली होती. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज शेअर करत कारवाईची मागणी केली होती. हनुमंत पवार यांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं होतं. तर, तुषार दामगुडे यांच्याकडील बंदूक जप्त करुन त्यांना सोडण्यात आलं होतं.
दरम्यान, तुषार दामगुडे यांच्याकडून घडलेल्या प्रकाराबाबत कोणतीही खंत वाटत नसून जे केलं ते बरोबर केल्याचं सांगण्यात आलं आहे. हनुमंत पवार यांना केलेल्या मारहाणीबाबत कोणताही पश्चाताप किंवा खंत वाटत नाही. मी जे केले ते योग्यच केले, असे मला वाटते. या प्रकारच्या लोकांना कधी कधी ठाम आणि स्पष्ट शब्दांतच उत्तर द्यावे लागते. त्या ठिकाणी जे काही घडले, त्याबद्दल मला कोणतीही खंत नाही. हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्या पार्श्वभूमीवर त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे गरजेचे होते, असं तुषार दामगुडेनी म्हटलं.
आणखी वाचा
Comments are closed.