हार्दिक पांड्यानं रोहित शर्माला थेट इशारा दिल्याचा कांगावा… सोशल मीडियावर खळबळ; मुंबई इंडियन्

हार्दिक पांड्याचा रोहित शर्माला इशारा आयपीएल 2026 (Indian Premier League) च्या हंगामाची उलटी गिनती सुरू झाली आहे. 28 मार्चपासून या स्पर्धेचा 19व्या हंगाम रंगणार असून सर्व संघांनी तयारी सुरू केली आहे. यादरम्यान 5 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) कॅम्पमधून एक धक्कादायक दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. सीझन सुरू होण्याआधी कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) इशारा दिल्याची चर्चा रंगली होती. मात्र यावर आता मुंबई इंडियन्सने स्पष्ट भूमिका घेतली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, हार्दिक पांड्याने रोहित शर्माला सांगितले आहे की या हंगामात जर त्यांची बॅट चालली नाही, तर ते सहन केले जाणार नाही. म्हणजेच रोहितच्या प्लेइंग-11 मधील स्थानावरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, अशी चर्चा त्या पोस्टमध्ये होती.

त्या पोस्टमध्ये असेही लिहिले होते की, “हार्दिक पांड्याने टीम मॅनेजमेंटला सांगितले आहे की जर रोहित यंदा चांगली कामगिरी करू शकले नाहीत, तर त्यांना अजिबात सहन केले जाणार नाही.” तसेच गेल्या 10-12 वर्षांत रोहितच्या कामगिरीबाबत मॅनेजमेंट नाराज असल्याचा दावाही करण्यात आला. पोस्टमध्ये पुढे असे म्हटले होते की, सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये असूनही रोहितने अनेक सीझनमध्ये फक्त 200-300 धावा केल्या आणि त्यांचा स्ट्राइक रेट साधारण 120 च्या आसपास राहिला.

मुंबई इंडियन्सची प्रतिक्रिया…

मात्र हा दावा व्हायरल होताच मुंबई इंडियन्सच्या अधिकृत अकाउंटने प्रतिक्रिया देत ही बातमी फेटाळून लावली. फ्रँचायझीने त्या पोस्टवर कमेंट करत फक्त दोन शब्दांत उत्तर दिले, “काहीही!” म्हणजेच ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, रोहित शर्माच्या फलंदाजीच्या फॉर्मबाबत चर्चा होत असल्या तरी त्याच्या नावावर मोठा कर्णधार म्हणून विक्रम आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. गेल्या दोन हंगामांपासून संघाची धुरा हार्दिक पंड्या सांभाळत असला, तरी अजूनपर्यंत त्याला संघाला पुन्हा विजेतेपद मिळवून देता आलेले नाही.

फलंदाजीच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर, 2013 नंतर रोहित शर्माने एका हंगामात 500 धावांचा टप्पा गाठलेला नाही. मात्र मागील सीझनमध्ये त्याने 15 सामन्यांत 29.86 च्या सरासरीने 418 धावा केल्या होत्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. त्यामुळे आगामी हंगामात रोहितच्या बॅटमधून मोठ्या धावा पाहायला मिळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

BCCI Naman Awards : BCCIची मोठी घोषणा! अवॉर्ड्समध्ये नवीन चेहरे चमकले, कोणत्या खेळाडूंना मिळाला पुरस्कार?

आणखी वाचा

Comments are closed.