हरमनप्रीत कौरचा मोठा विक्रम; विराट कोहली आणि बाबर आझमच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात मोठा टप्पा गाठला. 9 धावा पूर्ण करताच हरमनप्रीतने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला. हा पराक्रम करणारी ती स्मृती मंधाना नंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. तसेच महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारी ती एकूण तिसरी खेळाडू आहे.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सुझी बेट्स हिच्या नावावर आहे. हरमनप्रीतच्या या कामगिरीमुळे तिने विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा आणि जोस बटलर यांच्या विशेष क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी हरमनप्रीत ही सातवी क्रिकेटपटू ठरली. याआधी विराट कोहली, बाबर आझम, रोहित शर्मा, जोस बटलर, स्मृती मंधाना आणि सूजी बेट्स यांनी हा पराक्रम केला होता.

दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 26 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 5 बाद 168 धावा केल्या आणि भारतासमोर 169 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली, मात्र मधल्या फळीतील संथ फलंदाजीमुळे संघ पिछाडीवर पडला.

यास्तिका भाटिया हिने 36 चेंडूत 33 धावा केल्या, त्यानंतर तिला रिटायर्ड आऊट करण्यात आले. हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 28 धावांची खेळी केली, मात्र ती संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. या पराभवानंतर तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत आहेत.

मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 2 जून रोजी खेळवला जाणार आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ 12 जूनपासून सुरू होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Comments are closed.