हरियाणाची माती, पदकांची खाण

>> मंगेश वरवडेकर

आशियाई क्रीडा स्पर्धेची अंतिम पदकतालिका पहिली की एक गोष्ट हमखास जाणवते, ती म्हणजे आशियाई स्पर्धा गाजवली ती हरियाणवी खेळाडूंनी. हिंदुस्थानच्या तिरंग्याला सोन्याची किनार देण्यात हरियाणाच्या मातीत काहीतरी खास रसायन मिसळलेले असावे. बाकी राज्ये पदकांसाठी धडपडत असताना हरियाणा मात्र जणू म्हणतोय, तुम्ही खेळा, आम्ही पदके पाठवतो! असे छाती ठोकून सांगत होता.

हिंदुस्थानने 21 सुवर्ण, 27 रौप्य आणि 37 कांस्यासह एकूण 85 पदके जिंकली, पण या 85 पदकांच्या कहाणीत हरियाणाचा दबदबा वेगळाच आहे. हरियाणाच्या 48 खेळाडूंनी तब्बल 51 पदकांमध्ये आपला ठसा उमटवला. म्हणजे पदक जिंकण्याच्या बाबतीत हरियाणाने ‘वन-टू-वन’ नव्हे, तर ‘वन-टू-मोर’ पद्धत स्वीकारलेली दिसते. आता प्रश्न असा पडतो की, हरियाणवी पॅटर्नची प्रत देशभर लागू केला तर हिंदुस्थानच्या पदकांची संख्या किती वाढेल? कारण हा केवळ एका राज्याच्या यशाचा प्रश्न नाही. हा राष्ट्रीय क्रीडा व्यवस्थेसाठी अभ्यासाचा विषय आहे.

नागोयाच्या मैदानावर हरियाणवी खेळाडूंनी पुन्हा एकदा आपला दबदबा दाखवला आणि विशेष म्हणजे हा दबदबा एखाद्या एका खेळापुरता मर्यादित नाही. पुस्तीच्या आखाड्यापासून बॉक्सिंगच्या रिंगपर्यंत, तिरंदाजीपासून कबड्डीच्या मॅटपर्यंत आणि हॉकीच्या मैदानापासून नेमबाजीच्या शूटिंग रेंजपर्यंत हरियाणाचा झेंडा दिसतोय. एका दिवसात किर्ती शर्मा, परवीन हुड्डा, अंकुश पंघाल आणि सुजीत कलकल यांनी चार सुवर्णपदके जिंकली आणि अक्षरशः हरियाणाची ‘गोल्डन एक्प्रेस’ धावू लागली. बाकीचे राज्य पदकांची गाडी पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उभे आणि हरियाणा म्हणतोय, गाडी सुटली आहे, पुढच्या स्टेशनला भेटू!

हरियाणाच्या कहाणीचा खरा मसाला कबड्डीत आहे. हिंदुस्थानच्या सुवर्णविजेत्या पुरुष कबड्डी संघात तब्बल आठ खेळाडू सुनील मलिक, आशू मलिक, जयदीप दहिया, अंकित जगलान, राहुल रावल, देवांक दलाल, अयान आणि सुमित सांगवान हे हरियाणाचे होते. अंतिम सामन्यात हिंदुस्थानचा संघ पाहताना कधी कधी वाटावे, हा आशियाई क्रीडा स्पर्धेचा संघ आहे की हरियाणाची ऑल-स्टार टीम?

दुसरी गंमत अशी की, महिला कबड्डी संघातही हरियाणाचा मोठा वाटा होता. म्हणजे कबड्डीच्या दोन्ही सुवर्णपदकांवर हरियाणाच्या मातीची ठसठशीत सही! हिंदुस्थानात काही खेळांत हरियाणवी वर्चस्व असल्यामुळे त्यांच्या खेळाडूंची निवड झाली की नेहमीच बोंबाबोंब होते. याला का घेतले?, त्याला का घेतले नाही?, फलाण्या राज्याचा खेळाडू कुठे गेला? असे प्रश्न विचारले जातात. पण आता या स्पर्धेतील पदकांकडे पाहिल्यावर एक गोष्ट मान्य करावी लागेल की हे खेळाडू काही घुसखोरी करून संघात आलेले नव्हते. त्यांनी मॅटवर, रिंगमध्ये, मैदानावर आणि शूटिंग रेंजवर आपल्या कामगिरीने उत्तर दिले. पराभवाला कारणे हजार असतात. विजयाला मात्र एकच कारण पुरते. तुम्ही जिंकलात! आणि हरियाणाच्या मातीने ते पुन्हा एकदा दाखवून दिले.

आशियाई स्पर्धेची पदकतालिका पाहिल्यावर आकडे एकच गोष्ट सांगतात की, हरियाणाची क्रीडा ताकद प्रचंड आहे. मात्र हरियाणाच्या यशाचे रहस्य फार गुंतागुंतीचे नाही. गावोगावी सकाळ-संध्याकाळ मातीवर घाम गाळणारी मुले, आखाडय़ांची संस्कृती, पालकांचा पाठिंबा, खेळाडूंना मिळणारे प्रोत्साहन आणि ‘खेळ म्हणजे करिअर’ ही बदललेली मानसिकत आहे. या साऱयांचा हा परिपाक आहे. पानिपत, सोनीपतपासून रोहतक, झज्जर, हिसारपर्यंत मातीच खेळाडूंना घडवते. त्या मातीत पराभवाची चव लहानपणापासून कळते आणि विजयाची भूक त्याहून आधी लागते. म्हणून हरियाणाची पदके ही केवळ पदकतालिकेतील आकडे नाहीत. ती एका राज्याच्या क्रीडासंस्कृतीची ओळख आहेत. हिंदुस्थानची पदके 85 झाली असतील, पण त्यात हरियाणाच्या मातीचा वाटा मोजताना कॅल्क्युलेटरपेक्षा आखाडय़ातला घाम मोठा दिसतो.

हरियाणा जिंकतोय, कारण तिथे पदक आधी स्वप्नात येत नाही. ते आधी मातीवर घामात भिजते आणि मग गळय़ात पडते. कुणी काहीही बोलो, या मातीत फक्त खेळाडू घडत नाहीत; पदकांची भूक घडते. आणि ती भूक दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

कुस्ती, बॉक्सिंग, कबड्डी, हॉकी, नेमबाजी यानंतर आता अॅथलेटिक्समध्येही हरियाणा झेंडा गाडण्याच्या तयारीत आहे. म्हणजे उद्या 100 मीटरची शर्यत सुरू झाली आणि शेजारून एखादा हरियाणवी आवाज आला, थांबा जरा, आमचा मुलगा येतोय! तर आपण आश्चर्यचकित होऊ नये. खरं तर आता हरियाणाची हवा अवघ्या हिंदुस्थानला लागायला हवी. गावोगावी मैदानं हवीत. आखाडे हवे. खेळाला प्रतिष्ठा हवी. पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे आणि सरकारने खेळाडूच्या घामाची किंमत ओळखायला हवी. कारण हरियाणाने एक साधा पण मोठा धडा अवघ्या हिंदुस्थानला शिकवला आहे, पदकं फक्त मोठय़ा शहरांच्या स्टेडियममध्ये तयार होत नाहीत, ती गावच्या मातीमध्येही तयार होतात.

आता फक्त एक प्रश्न उरतो की, हरियाणवी खेळाडू नक्की कोणत्या चक्कीचा आटा खातात? तो आटा सापडला तर हिंदुस्थानच्या पदकपेटीचा आकार वाढवायला वेळ लागणार नाही. कदाचित पुढच्या आशियाई स्पर्धेत पदकतालिका पाहताना आपण म्हणू, ‘हरियाणाची माती सोन्याची खाण आहे हे माहीत होतं, पण एवढं सोनं निघतं, हे आता जगालाही कळलं!

Comments are closed.