उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस.

वादळ, वीज कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांत उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस, वादळ आणि वीज कोसळल्याने 24 जणांचा बळी गेला आहे. तसेच 15 जण जखमीही झाले आहेत. उत्तर प्रदेशात सोळा जनावरेही दगावली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रति शोक व्यक्त करतानाच जखमींवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आणि जीवित व मालमत्तेच्या नुकसानीमुळे बाधित झालेल्यांना 24 तासांच्या आत नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये बुधवारपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बाधित लोकांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेश सरकारने वादळ, आग, गारपीट आणि अतिवृष्टी यांसारख्या अलीकडील प्रतिकूल हवामानामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया जलद केली आहे.

Comments are closed.