पंजाबमध्ये हाय अलर्ट; पाकिस्तानी गुंड सक्रिय.

दोन ठिकाणांची रेकी झाल्याचे समोर

वृत्तसंस्था/ अमृतसर

पंजाबमध्ये मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट रचण्यात आल्याचे समोर आले आहे. गुप्तचर यंत्रणांनी राज्यात अलर्ट जारी केला आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीने सैन्यतळांना लक्ष्य करण्याचा कट रचला असून याकरता दोन स्थानांची रेकी करण्यात आल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी हस्तक अमृतसर जिल्ह्dयातील सैन्य ठिकाणांवर हल्ला करण्याचा कट रचत आहेत. यासंबंधी गुप्तचर यंत्रणांनी पंजाब पोलिसांसमवेत अन्य यंत्रणांना माहिती पुरविली आहे. तसेच या इनपूटला अत्यंत गांभीर्याने घेत संवेदनशील स्थानांवरील सुरक्षा वाढविण्यात यावी असे सुरक्षा यंत्रणांना सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानी हस्तकांची नावे राणाभाई आणि मलिक असल्याचे समजते. कटाच्या अंतर्गत खासा छावणी आणि तळानजीक बूढा ठेहची रेकी करण्यात आली आहे. खासा छावणीमध्sय काही काळापूर्वी स्फोट झाला होता, परंतु फारसे नुकसान झाले नव्हते. हा स्फोट छावणीच्या कुंपणभिंतीनजीक झाला होता.

स्फोटाशी कनेक्शन

हा स्फोट पूर्वनिर्धारित कटाच्या अंतर्गत करण्यात आला होता असा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. परंतु आतापर्यंत मागील घटना आणि वर्तमान इनपुट्सदरम्यान कुठलेच कनेक्शन आढळून आलेले नाही.

शहजाद भट्टी नेटवर्क विरोधात कारवाई

धार्मिक तसेच संवेदनशील ठिकाणांवर हल्ला करणे आणि राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याच्या कटात सामील शहजाद भट्टी नेटवर्कच्या विरोधात 12 गुन्हे नोंद करत 52 जणांना अटक करण्यात आली आहे. ही टोळी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीच्या निर्देशावर काम करत होती. नेटवर्क सोशल मीडियाद्वारे भारतीय युवांची भरती करत त्यांना कट्टरवादात लोटत होता असा आरोप आहे.

एनआयए करतेय चौकशी

भट्टीशी निगडित अनेक प्रकरणांची चौकशी एनआयए करत आहे. यात मार्च 2025 मध्ये पंजाबमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रोजर संधूच्या निवासस्थानी झालेला ग्रेनेड हल्ला आणि त्याचवर्षी हरियाणाच्या एका पोलीस स्थानकात झालेला स्फोट सामील आहे. एनआयएने एप्रिल 2026 मध्ये फरार म्हणून भट्टीच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते.

Comments are closed.