योगी आदित्यनाथ यांचा घणाघाती हल्ला

मनुस्मृती’वरुन राहुल गांधी यांच्यावर टीका

► वृत्तसंस्था / लखनौ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कडाडून टीका केली आहे. मनुस्मृतीचे निमित्त करुन राहुल गांधी हे महिलांना भडकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना मनुस्मृती किंवा कोणत्याही भारतीय प्राचीन धर्मग्रथांचे ज्ञान नाही. ते महिलांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. त्यांचा उद्देश सनातन धर्माचा अवमान करण्याचा आहे. हिंदू धर्मग्रंथांमधील वचने ते विकृत स्वरुपात लोकांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा घणाघात योगी आदित्यनाथ रायबरेली येथे एका जाहीर सोमवारी केला. विशेष म्हणजे रायबरेली हा राहुल गांधी हे याच मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

हिंदू धर्मात अनेक परंपरा आहेत. हिंदू धर्मातील भिन्न भिन्न समाजघटक त्यांच्यापैकी वेगवेगळ्या परंपरांचे पालन करीत असतात. त्यामुळे कोणताही फरक पडत नाही. तथापि, धार्मिक वचनांचा चुकीचा अर्थ लावून त्याद्वारे समाजात गोंधळ निर्माण करणे आणि समाजाला भ्रमित करण्याचा प्रयत्न करणे, अवांछनीय आहे. मनुस्मृतीत अनेक उपयुक्त तत्वे आहेत. मनुस्मृतीत देण्यात आलेली कालगणना आज असंख्य हिंदू लोक पाळतात. ही कालगणना शास्त्रशुद्ध असून त्यासारखी योग्य कालगणना कोणत्याही संस्कृतीत नाही. मनुस्मृतीत मानवी जीवनासंबंधी आणि समानतेसंबंधीही अनेक तत्वे आहेत. हिंदू जनतेला याचे ज्ञान आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या जाळ्यात कोणी अडकणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.

गांधी यांची टीका

पुणे येथे काही दिवसांपूर्वी विद्यार्थी आणि युवकांसमोर केलेल्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी मनुस्मृतीवर टीका केली होती. मनुस्मृती महिलांचे स्वातंत्र्य हिरावून घेते. त्यामुळे महिलांनी अशा मानसिकतेतून बाहेर पडावे, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे मोठाच वाद निर्माण झाला असून त्यांनी मनुस्मृती समजून घेऊन तिच्याविषयी बोलावे. समाजात धर्माच्या नावावर निवडक पद्धतीने वक्तव्य करुन स्वत:च्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नये. अशा वक्तव्यांचा कोणताही राजकीय लाभ होत नाही, हे समजून घ्यावे, अशी टीकाही अनेकांनी केली आहे.

Comments are closed.