जरांगे भडकले, मराठ्यांना आरक्षण देणार नाही हे एकदा सांगून टाका! आंदोलनावर ठाम
फडणवीस सरकारचे तीन मंत्री, भाजपच्या एका आमदाराची मध्यस्थी निष्फळ ठरली आहे. 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत मराठा समाजाचे न भूतो न भविष्यति असे आंदोलन होणार असल्याचे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मराठा आरक्षणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनीच मिठाचा खडा टाकल्याचा आरोप करताना आरक्षण देणारच नाही असे एकदाचे सांगून टाका, म्हणजे आम्ही दुसऱया राज्यात जाऊन हमाली करतो, असे जरांगे यांनी सुनावले.
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण, मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे, 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र वाटप आदी मागण्यांसाठी मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटीत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई तसेच भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आज आंतरवाली गाठून मनोज जरांगे यांच्याशी दोन तास चर्चा केली.
सरकार मराठय़ांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार नाही, असे सरकारने एकदाचे सांगून टाकावे, आम्ही दुसऱया राज्यात जाऊन हमाली करतो, असा संताप मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. कुणबी प्रमाणपत्र दिले जाते, परंतु वैधता दिली जात नाही, असा अन्याय का, असा सवालही त्यांनी केला. 58 लाख नोंदीच्या संदर्भात यावेळी मनोज जरांगे यांनी न्या. संदीप शिंदे यांच्याशी पह्नवरून चर्चा केली.
झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करणार
मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी अधिकारी स्तरावर टाळाटाळ करण्यात येत असल्याची कबुली दिली. या झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करणार, असेही ते म्हणाले.
Comments are closed.