मी आता थकलोय, जास्त काम करू शकत नाही! ई-20 आंदोलनानंतर गडकरींनी गिअर बदलला, जाहीर कार्यक्रमात स्वतःच दिली कबुली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेबदल होणार असल्याच्या चर्चांनी मागील काही दिवसांत चांगलाच जोर पकडला आहे. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मी आता थकलोय, जास्त काम करू शकत नाही, असे सांगत राजकीय निवृतीचे संकेत दिले. देशभरात ई-20 पेट्रोलविरोधात वाढलेला रोष, आंदोलने आणि वाहनधारकांच्या तक्रारींनंतर गडकरी यांनी आपल्या भूमिकेत बदल करत गिअर बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

नागपूर जिह्यातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्गा’च्या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी आपल्या राजकीय निवृत्तीबाबत अत्यंत सूचक विधान केले. पूर्वी पक्षाचं काम करताना समोसा खाऊन झोपत होतो. कोरोनानंतर शिस्तबद्धता आलीय. आता मी काही जास्त काम करू शकत नाही. ज्या वेळी करू शकलो तेव्हा केलं. आता नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे, असे गडकरी म्हणाले. रोज सकाळी अर्धा तास व्यायाम आणि प्राणायाम करा, असा सल्लाही त्यांनी तरुणांना दिला.

…तर सत्ता, संपत्तीचा काय उपयोग

तुमची तब्येत चांगली असेल तर उपयोग आहे. तब्येत बिघडली तर सत्ता, संपत्ती, सौंदर्य आणि ज्ञानाचा काय उपयोग आहे? इथे बसला आणि एका मिनिटात हार्टअटॅक आला तर काय येणार सोबत? गाडी नाही येणार, घोडा नाही येणार, बंगला नाही येणार. बायको नाही येणार आणि मुलं नाही येणार. कोणीच येणार नाही. खाली हात आला आहे, खाली हात जाणार आहे, असे गडकरी म्हणाले.

Comments are closed.