मुंबईच्या विकासात अडथळा येऊ देणार नाही, हायकोर्टाने खडसावले; मेट्रो स्थानकासाठी दुकानाचे स्थलांतर
उपजीविकेचे साधन असले तरी मुंबईच्या विकासातील अडथळा दूर करावाच लागेल, असे खडसावत मुंबई मेट्रो स्थानकाच्या बांधकामात अडचण होत असलेल्या दुकानदाराला उच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले.
मेट्रो 2-ब मार्गिकेतील एका स्थानकाच्या बांधकामासाठी हे दुकान स्थलांतरित करणे आवश्यक आहे. याकरिता महापालिकेने अर्ज दाखल केला. या अर्जावर न्या. जितेंद्र जैन यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. त्यात या दुकानदाराचे कान उपटत न्यायालयाने या दुकानाचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले.
हे दुकान स्थलांतरित केले जाईल, अशी ग्वाही दुकानदाराने दिले. दुकान स्थलांतरित न झाल्यास पालिकेने ते हटवावे. यासाठी पोलीस संरक्षण लागल्यास अर्ज करावा. पण या दुकानाचा अडसर दूर करून मेट्रो स्थानकासाठी जागा उपलब्ध करुन द्या, असे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले आहेत.
27 जागांचा पर्याय
हे दुकान स्थलांतरित करण्यासाठी पालिकेने 27 जागांचा पर्याय दिला. यातील कोणतीही जागा सोयीस्कर नसल्याचे दुकानदाराने सांगितले. त्यावर संतप्त होऊन न्यायालयाने कारवाईचा इशारा दिला.
मेट्रो मुंबईकरांसाठी नितांत गरजेची
मेट्रो मुंबईकरांसाठी नितांत गरजेची आहे. कोणा एकासाठी मेट्रोचे काम रोखता येणार नाही. कठोर कारवाईपेक्षा रीतसर दुकानाचे स्थलांतर व्हावे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
Comments are closed.