हिंगोली जिल्हा रूग्णालयासाठी १५ एकर जागेला ‘हिरवा कंदील’, ६०० बेडची सुविधा उपलब्ध होणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हिंगोली जिल्हा रूग्णालयासाठी स्वतंत्र पशूसंवर्धन विभागाची 15 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाला ‘हिरवा कंदील’ दाखवण्यात आला असून, ही जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेलाही आता वेग आला आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या 200 बेडची व्यवस्था आहे. नव्या जागेमुळे 600 बेडची व्यवस्था होणार आहे.

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात सद्यस्थितीत 200 बेडची सुविधा उपलब्ध आहे. शहरासह जिल्ह्यातील पाचही तालुक्यातील ग्रामीण भागातून रुग्ण दररोज जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल होत असतात. पूर्वी जिल्हा रुग्णालयात मिळणार्‍या अपुर्‍या सुविधेमुळे येथील रुग्ण नांदेडसह इतरत्र पाठवण्यात येत होते. परंतु, मागील काही वर्षांपूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयात लागणार्‍या सुविधा मंजूर करुन अद्यावत सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे इतर ठिकाणी रुग्ण पाठवण्याचे प्रमाणही कमी झाले. दरम्यान, २०२३ मध्ये हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेला शासकीय मान्यता प्राप्त झाली. त्यानंतर २०२४ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज सुरु झाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असल्यामुळे महाविद्यालय खासगी जागेत सुरु आहे. तर जिल्हा रुग्णालयाची संपूर्ण इमारत व संपूर्ण कामकाज वैद्यकीय महाविद्यालयाकडे काही वर्षांसाठी हस्तांतरित करण्यात आले. जिल्हाभरातून येणार्‍या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी परिसराला खेटूनच असलेली पशूसंवर्धन विभागाची १५ एकर जागा जिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत पुढील प्रशासकीय प्रक्रियेला वेग दिला आहे. या १५ एकर जागेमध्ये ५०० बेडचे सामान्य रूग्णालयाची इमारत उभारण्यात येणार आहे. तर ५० बेडचे आयुष हॉस्पिटल आणि ५० बेडचे ट्रामा (अपघात विभाग) सेंटरची इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काही वर्षांत हिंगोली जिल्ह्यातील रूग्णांना जिल्हा सामान्य रूग्णालयातच दर्जेदार आरोग्यसेवा मिळणार आहे.

नव्याने ९० पदे भरली जाणार

हिंगोली शहरातील तोफखाना परिसरात १०० बेडचे स्त्री रूग्णालयाच्या इमारतीचे काम अंतीम टप्प्यात आले आहे. या रूग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ सह बाह्यरूग्ण लिपीकापर्यंत अशा अधिकारी-कर्मचार्‍यांच्या ९० पदांची नव्याने पदभरती करण्यात येणार आहे. शासनाकडून या पदभरतीची लवकरच प्रक्रिया होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांनी सांगितले.

Comments are closed.