रेल्वेत स्टेशन मास्तर पदासाठी भरती सुरू; 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन, जाणून घ्या माहिती…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रेल्वेत सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती मंडळाकडून (RRB) स्टेशन मास्तर पदाच्या भरतीसाठी अधिकृत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 25 नोव्हेंबर ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.

या भरती प्रक्रियेतंर्गत एकूण रिक्त पदांच्या संख्येबाबत विविध अहवालांमध्ये तफावत दिसून येत असून, काही अहवालांनुसार 1250 तर काहींनुसार 1265 जागांवर भरती केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी संबंधित आरआरबीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन एकूण पदे आणि विभागनिवार रिक्त जागांची सविस्तर माहिती तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे बोर्डाकडून करण्यात आले आहे. स्टेशन मास्तर पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे अनिवार्य आहे.

या पदासाठीच्या निवड प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने संगणक आधारित चाचणी (CBT), संगणक आधारित अभियोग्यता चाचणी (CBAT), कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यांचा समावेश असणार आहे. पात्र उमेदवारांना अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम rrbapply.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर होमपेजवर उपलब्ध असलेली संबंधित भरतीची लिंक उघडून नोंदणी व लॉगिन करून अर्ज पूर्ण करावा लागेल. अर्जात विचारलेली सर्व आवश्यक माहिती अचूक भरल्यानंतर योग्य ती कागदपत्रे अपलोड करावीत, परीक्षेचे शहर निवडावे आणि विहित शुल्क भरावे. सर्व तपशील पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासून अर्ज सबमिट करावा.

या भरतीसाठी अर्ज करताना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार असून, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. नोंदणी शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2026 आहे. या पदावर अंतिम निवड होऊन रुजू झाल्यानंतर उमेदवारांना वेतन स्तर 6 अंतर्गत वेतन दिले जाणार आहे. यामध्ये दरमहा 35 हजार 400 रुपये मूळ पगार आणि 4 हजार 200 रुपयांच्या ग्रेड पेसह इतर अनेक भत्त्यांचा व लाभांचा समावेश असणार आहे.

Comments are closed.