Hingoli news – संतप्त शेतकरी भाजप आमदार तान्हाजी मुटकुळेंच्या घरात शिरले; महिलांचा ठिय्या, जोरदार घोषणाबाजी
हिंगोली तालुक्यातील डिग्रस (कऱ्हाळे) येथील प्रस्तावित साठवण तलाव रद्द करण्यात यावा यासाठी मागील काही दिवसापासून लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह महिलांनी लेकराबाळांसह गुरे-ढोरे घेऊन आंदोलन सुरू केले आहे. संतप्त झालेल्या शेतकरी व महिलांनी शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरात शिरूर डिग्रस (कऱ्हाळे) तलाव रद्द करण्यात याव्यात अशा घोषणा दिल्या. शेतकरी व महिला घरात शिरल्यामुळे काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता.
हिंगोली तालुक्यातील डिग्रस (कऱ्हाळे) येथील प्रस्तावित साठवण तलाव रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी डिग्रस कऱ्हाळे, दाटेगाव व लोहगाव येथील शेतकरी व महिलांनी आपल्या लेकराबाळांसह गुरे-ढोरे व बैलगाडा घेऊन लघू पाटबंधारे कार्यालयासमोर 1 सप्टेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना डिग्रस कऱ्हाळे येथील साठवण तलाव तयार करण्याचा घाट का घातला जात आहे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट घेऊन तलाव रद्द करण्याची मागणी शासनाकडे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी साठवण तलाव करण्यासाठी स्थानिक आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मागणी केली असल्याचे पत्र देण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर संतप्त झालेल्या शेतकरी व महिला भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या घरी साडेआठ वाजताच्या सुमारास धडकले. आमदार मुटकुळे हे प्रकृतीच्या कारणामुळे शेतकऱ्यांशी भेटू शकले नाही. आमदारांचे पुत्र शिवाजी मुटकुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांनी साठवण तलावाची आमची कोणतीही मागणी नसताना आमदारांनी साठवण तलावाची मागणी का केली याचा जाब विचारला असता, शिवाजी मुटकुळे यांनी मला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले.
आमदारांनी दिलेल्या पत्रामुळे साठवण तलाव तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांनीच साठवण तलाव रद्द करण्यात यावा, असे पत्र शासनाला द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसह महिलांनी लावून धरली होती. तसेच शिवाजी मुटकुळे यांनी लघू पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना काहीदिवस काम बंद करण्यास सांगावे, अशी मागणी केली. परंतु, शिवाजी मुटकुळे यांनी मला तसा कोणताही अधिकार नसल्याचे सांगितले. यावर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तलाव रद्द झालाच पाहिजेच्या घोषणा दिल्या. आमदार तानाजी मुटकुळे यांच्यासह जिल्हा प्रशासनाकडून साठवण तलाव रद्द करण्याचे कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे शनिवारीही लघू पाटबंधारे कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे.
शिवाजी मुटकुळेंकडून शेतकऱ्यांची बोळवण
आमदार तानाजी मुटकुळे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे मतदार संघातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी त्यांचे पुत्र शिवाजी मुटकुळे हे काम बघतील असा व्हिडिओ काही दिवसापूर्वी तान्हाजी मुटकुळे यांनी रुग्णालयातून सोशल मीडियावर प्रसारित केला होता. मात्र डिग्रस साठवण तलाव रद्द करण्यासह त्याचे काम काही दिवस थांबविण्यात यावे, या मागणीसाठी आमदार मुटकुळे यांच्या घरी गेलेल्या शेतकरी व महिलांना आमदारांचे पुत्र शिवाजी मुटकुळे यांनी मला तसा कोणताही अधिकार नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची बोळवण करण्याचे काम केले.
आंदोलक महिलांना भोवळ
हिंगोली येथील लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर मागील काही दिवसांपासून शेतकरी व महिलांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी काही महिला लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी कांबळे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेल्या असता दोन शेतकरी महिलांना भोवळ आल्याचा प्रकार घडला. त्यानंतर दोन्ही महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
Comments are closed.