IND vs WI: हिटमॅनची सेंच्युरी थोडक्यात हुकली! जवळपास सात वर्षांनंतर रोहित शर्मासोबत घडलं असं

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि जगभरात ‘हिटमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) वेस्ट इंडिजविरूद्ध आणखी एका शतकापासून थोडक्यात हुकला. शतकासाठी त्याला केवळ 8 धावांची गरज असताना तो 92 धावांवर बाद झाला. भारत आणि वेस्ट इंडिज (Odi series between IND vs WI) यांच्यातील वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यातही रोहितने शानदार फलंदाजी केली. जवळपास सात वर्षांनंतर रोहित पुन्हा एकदा ‘नर्व्हस नाईन्टीज’चा बळी ठरला आहे.

यासोबतच रोहित भारतासाठी नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद होणारा सर्वाधिक वयाचा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर होता.

न्यू चंदीगड येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या वनडे सामन्यात रोहित शर्माने 85 चेंडूंमध्ये 92 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. याच डावादरम्यान रोहित वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10 हजार धावा पूर्ण करणारा सलामीवीरही ठरला आहे.

रोहित पुन्हा एकदा शुबमन गिलसोबत (Shubman Gill) भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरला होता. मात्र तिसऱ्याच षटकात कर्णधार शुबमन गिल बाद झाला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीही तंबूत परतला. त्यामुळे भारताच्या धावफलकावर केवळ 4 धावा असताना संघाने दोन विकेट गमावल्या होत्या.

यानंतर रोहितने ऋतुराज गायकवाडसोबत (Ruturaj Gaikwad) डाव सावरला. दोघांनी मिळून 100 हून अधिक धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाला, तेव्हा भारताची धावसंख्या 141 धावांवर पोहोचली होती. शुबमन गिल आणि विराट कोहली हे दोघेही खाते न उघडताच बाद झाले.

यापूर्वी रोहित शर्मा मार्च 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात 90 धावांवर बाद झाला होता. हा सामना मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळला गेला होता. त्यानंतर आता जवळपास सात वर्षांनी रोहित पुन्हा एकदा वनडे क्रिकेटमध्ये 90 धावांचा टप्पा पार केल्यानंतर शतकापूर्वीच बाद झाला आहे. रोहित त्याच्या कारकिर्दीत सातव्यांदा 90च्या दशकात बाद झाला आहे.

विशेष म्हणजे, रोहित आता भारतासाठी सर्वाधिक वयात 90च्या दशकात बाद होणारा खेळाडू ठरला आहे. सामन्याच्या दिवशी रोहितचे वय 39 वर्षे 156 दिवस होते. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. 2011 मध्ये सचिन 38 वर्षे 212 दिवसांचा असताना 90च्या दशकात बाद झाला होता. त्याआधी हा विक्रम सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांच्या नावावर होता. 1987 मध्ये गावस्कर 37 वर्षे 246 दिवसांचे असताना 90च्या दशकात बाद झाले होते.

Comments are closed.