आरबीआयच्या रेपो रेट कपातीनंतर गृह कर्जाचे व्याज दर किती? 7.10 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 5 डिसेंबरला रेपो रेट जाहीर करण्यात आले होते. आरबीआयनं रेपो रेटमध्ये 0.25 बेसिस पॉईंटनं कपात केली आहे. त्यामुळं रेपो रेट 5.25 टक्क्यांवर आला आहे. आरबीआयनं रेपो रेटमध्ये कपात केल्यानं बँकांनी गृहकर्जाच्या व्याज दरात कपात केली आहे. याशिवाय काही बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दर देखील घटवले आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं व्याज दरात कपात केल्यानंतर याचा फायदा ग्राहकांना पोहोचवण्याचे आदेश बँकांना दिल्या होत्या. हाऊसिंग फायनान्स कंपन्यांना आणि खासगी बँकांच्या तुलनेत सार्वजनिक बँकांचे गृहकर्जाचे व्याज दर कमी आहेत.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे व्याज दर
घर खरेदीसाठी ज्यांना गृहकर्ज घ्यायचं आहे. त्यांच्यासाठी सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक बँका फायदेशीर ठरतात. कारण कमी व्याज दरावर सार्वजनिक बँकांकडून गृहकर्ज दिलं जातं. सार्वजनिक बँकांचे व्याज दर 7.10 टक्क्यांपासून सुरु होतात.
स्टेट बँक ऑफ इंडियाचा गृहकर्जाचा व्याज दर 7.25 ते 8.70 टक्क्यांदरम्यान आहे. बँक ऑफ महाराष्ट्रसेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया यांच्या गृहकर्जाच्या व्याजाचा दर 7.10 टक्क्यांपासून सुरु होतात. पंजाब नॅशनल बँकेकडून 7.20 टक्के व्याज दर गृहकर्जासाठी आकारला जातो. कॅनरा बँक, यूको बँक यांच्याकडून पगारदार, महिला कर्जदारांसाठी व्याज दरात सूट दिली जाते.
खासगी बँकांचा गृह कर्जाचा व्याज दर किती?
खासगी बँकांकडून गृह कर्जाचा व्याज दर सार्वजनिक बँकांचा व्याज दर अधिक असतो. आयसीआयसीआय बँक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्याकडून 7.65 टक्के आणि 7.70 टक्के व्याज दरावर गृहकर्ज दिलं जातं. ॲक्सिस बँकेकडून 8.35 ते 12 टक्क्यांदरम्यान गृह कर्ज दिलं जातं.
हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून स्वयंरोजगार करणाऱ्या ग्राहकांना गृहकर्ज दिलं जातं. एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि आयसीआयसीआय होम फायनान्सकडून 7.50 टक्क्यांनी गृहकर्ज दिलं जातं आहे बजाज हाऊसिंग फायनान्स कंपनीकडून 7.40 टक्क्यांनी गृहकर्ज दिलं जातं. टाटा कॅपिटल आणि आदित्य बिर्ला कॅपिटल यांच्याकडून 7.75 टक्क्यांनी गृहकर्ज दिलं जातं आहे.
चांगला क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कमी व्याज दरात गृह कर्ज दिलं जातं. ग्राहकाच्या उत्पन्नाची स्थिरता, कर्जाची रक्कम आणि मालमत्तेचा प्रकार यावर गृहकर्ज मिळतं. महिला कर्जदार आणि कर्ज ट्रान्सफर करताना कमी व्याज दरावर कर्ज मिळतं. कर्जदारांनी गृह कर्ज घेताना अंतिम व्याज दर तपासून घेणं आवश्यक आहे. दरम्यान, भारतात सार्वजनिक बँकांचं गृहकर्ज क्षेत्रावर वर्चस्व आहे.
आणखी वाचा
Comments are closed.