50 लाख रुपयांचं गृहकर्ज घेतल्यानंतर परतफेड करताना व्याजाचे 13 लाख कसे वाचवायचे?

गृहकर्ज मुंबई : आजकाल प्रत्येकाला स्वत: चं छोटं का असेना स्वत:  चं घर असावं असं वाटतं. मात्र, घरांच्या किमती 40 ते 50 लाखांपासून पुढे कोट्यवधी रुपयांपर्यंत असल्यानं घर खरेदी करताना बँकांकडून गृहकर्ज काढावं लागतं. आरबीआयनं रेपो रेट 5.25 टक्के ठेवल्यानं गृह कर्जांचे व्याज दर 7.10 टक्क्यांपासून सुरु होतात. मात्र, गृहकर्ज घेतल्यानंतर बँकेच्या नियमाप्रमाणं परतफेड करण्याचा विचार केल्यास जवळपास दुप्पट रकमेची परतफेड करावी लागते. गृहकर्जाची परतफेड करताना एक फॉर्म्युला वापरल्यास मोठ्या रकमेची बचत होऊ शकते.

सीए नितीन कौशिक यांचा फॉर्म्युला नेमका काय?

गृहकर्जाची परतफेड करताना व्याजापोटी भरावी लागणारी अतिरिक्त रक्कम कशी वाचवायची यासंदर्भात सीए नितीन कौशिक यांनी त्यांच्या एक्स खात्यावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी त्यांच्या उदाहरणात गृहकर्जाची रक्कम 50 लाख आणि व्याजाचा दर 8 टक्के आणि कर्ज कालावधी 20 वर्ष ठेवला आहे.

नितीन कौशिक यांच्या उदाहरणानुसार समजा तुम्ही 50 लाखांचं गृहकर्ज 8 टक्के व्याजावर 20 वर्षांसाठी घेतलं तर तुम्हाला दरमहा 41800 रुपयांचा हप्ता भरावा लागेल. प्रामाणिक कर्ज परतफेड करणारा बँकेचा ग्राहक म्हणून तुम्ही जर 20 वर्ष कर्ज परतफेड करायला गेलात तर तुम्हाला 50 लाखांचं मुद्दल आणि व्याज 48 लाख रुपये असं एकूण 98 लाख रुपये बँकेला द्यावे लागतील.

बँकेला द्याव्या लागणाऱ्या व्याजातील 13 लाख रुपये वाचवण्यासाठी सीए नितीन कौशिक यांच्या फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला मुद्दल कमी करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. व्याज नेहमी मुद्दलावर आकारलं जातं, त्यामुळं मुद्दल कमी करण्याकडे लक्ष द्यावं  यामुळं भविष्यातील ईएमआयमधून व्याजाची रक्कम कमी होईल.

सीए नितीन कौशिक यांच्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या तीन वर्षात दरवर्षी 1 हप्ता अधिक भरावा. यामुळं कर्जाचा कालावधी कमी होईल, चौथ्या वर्षी अडीच लाख रुपयांची रक्कम मुद्दलात जमा करा.  पुढील 5 ते 10 वर्षाच्या कालावधीत 2-3 ईएमआय अतिरिक्त भरा. दहाव्या वर्षी 1 लाखांची रक्कम थेट मुद्दलात जमा करा. यामुळं तुमचं कर्ज साडेबारा वर्षात पूर्ण संपेल. या कालावधीमध्ये तुम्हाला 50 लाखांवर 35 लाख रुपये व्याज द्यावं लागेल. यामुळं तुमचे 13 लाख रुपये वाचतील. आणि साडे सात वर्ष आर्थिक दृष्ट्या स्वंतत्र व्हालं.

आरबीआयच्या सूचनांनुसार फ्लोटिंग रेटवरील गृहकर्ज घेतलं असल्यास प्रीपेमेंटवर शुल्क किंवा दंड आकारला जात नाही. तुम्ही बँकेला प्रीपेमेंटची रक्कम कर्ज कालावधी कमी करण्यासाठी भरावी, ईएमआय कमी करण्यासाठी नव्हे असं बँकेला सांगावं.

तुम्ही तुमच्या कर्जाच्या पहिल्या पाच वर्षात  जो  1 रुपया अतिरिक्त भराल तो भविष्यात तुमचे 3-4 रुपये वाचवेल. प्रत्येक 6 महिन्यानंतर तुमच्या गृहकर्जात 5000 ते 10000 रुपयांची रक्कम जमा करावी.

गृहकर्ज परतफेड करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

गृहकर्जाचा हप्ता तुमच्या दरमहा उत्पन्नाच्या 35-40 टक्क्यांपेक्षा कमी असावा. दरवर्षी 1 ते 3 ईएमआय अतिरिक्त भरा. बोनस आणि इनक्रिमेंट म्हणून मिळालेली रक्कम मु्द्दलात जमा करा. कर्जकालावधी कमी करा, ईएमआय नव्हे. कर्जाची शिल्लक रक्कम दरवर्षी पाहा.

आणखी वाचा

Comments are closed.