मुस्लिमबहुल भागांमध्ये कमी मतं पडली अन् संग्राम जगतापांच्या राजकारणाचा पॅटर्न 180 अंशात बदलला
Sangram Jagtap in Ahilyanagar: अहिल्यानगर शहराचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी मागील काही दिवसांपासून घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कधीकाळी सेक्युलर अशी भूमिका असलेले संग्राम जगताप (Sangram Jagtap) अचानक उघडपणे हिंदुत्ववादी (Hindutva) भूमिका घेताना दिसत आहेत मग विविध धार्मिक स्थळांचा असलेला वाद, लव्ह जिहाद सारखे प्रकरण किंवा हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चामध्ये त्यांच्याकडून होत असलेल्या आक्रमक भाषण यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
राष्ट्रवादीचे अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांची कौटुंबिक पार्श्वभूमी तशी वारकरी संप्रदायाची त्यांच्या आजोबा बलभीम जगताप तसेच वडील अरुण जगताप यांनी वारकरी संप्रदायाला वाहून घेतले होते. अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या प्रत्येक दिंडीला महाप्रसादाचे आयोजन त्यांच्याकडून केलं जायचे. तसाच पगडा संग्राम जगताप यांच्यावर देखील होता. मात्र, वारकरी सांप्रदाय हा केवळ हिंदुत्ववादी संप्रदाय नसून सर्वधर्मसमभाव जपणारा संप्रदाय आहे. त्यातच आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांच्यामागे देखील अहिल्यानगर शहरातील मुस्लिम समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याचं वारंवार सिद्ध झाले आहे.
गेल्या निवडणुकीत आमदार संग्राम जगताप यांना मुस्लिम बहुल भागामध्ये अतिशय कमी मतदान पडले आणि संग्राम जगताप हे हिंदुत्वाकडे झुकल्याचे पाहायला मिळाले. वेगवेगळ्या हिंदू मोर्चांमध्ये ते उघडपणे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासोबत हिंदुत्ववादी भूमिका घेताना दिसून आले. त्यावेळी त्यांनी मुस्लिम समाजावर तिखट शब्दात टीका देखील केल्याचं पाहायला मिळाले.
Sangram Jagtap: एका निवडणुकीने संग्राम जगतापांचा पॅटर्न बदलला, प्रखर हिंदुत्त्वाची कास धरली
राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीमध्ये सहभागी झाला. राष्ट्रवादी पक्ष तसा पुरोगामी विचारांचा असला तरी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही बदल झालेला पाहायला मिळतोय. अहिल्यानगर येथील आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख निर्माण केली आहे, मागील काही महिन्यांपासून संग्राम जगताप हिंदुत्वाबद्दल आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. नगर शहरामध्ये दबदबा असलेल्या संग्राम जगताप यांची आमदारकीची तिसरी टर्म आहे.
राजकारणाच्या सुरुवातीपासूनच शरद पवारांसोबत असलेल्या संग्राम जगताप यांचा राजकारण हिंदू-मुस्लिम तरुण कार्यकर्त्यांभोवती फिरण्याचे पाहायला मिळत होते. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर संग्राम जगताप अचानक बदलले आणि प्रखर हिंदुत्व स्वीकारत आक्रमक पवित्रा घेऊ लागले. याची सुरुवात सिद्धटेक येथील अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धिविनायक गणपती मंदिरासमोर असलेल्या एका मुस्लिम धार्मिक स्थळ जगताप यांनी आपल्या समर्थकासह जाऊन उखडून टाकले. यानंतर मढी येथे मुस्लिम समाजाकडून कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या जमिनीवर केलेल्या अतिक्रमणाविरोधात भूमिका घेतली. शनिशिंगणापूर येथील मुस्लिम कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला अशा घटनांनंतर संग्राम जगताप यांचा प्रखर हिंदुत्वाचा चेहरा समोर आला. जिल्ह्यातच नाही तर जिल्हा बाहेरही वेगवेगळ्या हिंदुत्ववादी आंदोलनासाठी संग्राम जगताप जाऊ लागले. यात प्रामुख्याने सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे झालेल्या सभेमध्ये केलेलं वक्तव्य मोठा चर्चेचा विषय ठरला , या त्यानंतर दौंड येथे झालेल्या सभेतही संग्राम जगताप यांनी आक्रमक भाषण केले.
आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने राष्ट्रवादी अजित पवार गटातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाल्याचे चित्र देखील समोर आले. यावर पदाधिकाऱ्यांनी अजितदादा यांच्यामार्फत संग्राम जगताप यांना समज देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संग्राम जगताप यांनी आपली भूमिका आजही कायम ठेवली आहे. संग्राम जगताप यांनी घेतलेल्या भूमिके नंतर ते भाजपमध्ये जातील, अशी देखील चर्चा सुरू आहे कारण संग्राम जगताप यांचे सासरे भाजपच्या विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले हे आहेत संग्राम जगताप यांची भूमिका पाहता ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी जरी शक्यता व्यक्त केले जात असले तरी अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक मातब्बर नेते सध्या भाजपमध्ये आहेत आणि त्यामुळे त्यांना भाजपमध्ये गेल्यानंतर फायदा होईल की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. दुसरीकडे संग्राम जगताप हे केवळ त्यांना मुस्लिम बहुल भागात झालेल्या कमी मतदानामुळेच अशी भूमिका घेत आहेत का, अशी देखील चर्चा सुरू आहे.
एकीकडे संग्राम जगताप यांना पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडून केवळ समज दिली जात असली तरी प्रत्यक्ष त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेला अजित पवारांचा देखील छुपा पाठिंबा आहे का? अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे कधीकाळी सेक्युलर विचारांचे असलेले संग्राम जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करणार का? की राष्ट्रवादी अजित पवार गटातच राहून हिंदुत्वाचा आपला अजेंडा पुढे नेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=8ntcbdco0p4
आणखी वाचा
संग्राम जगताप भाषण करताना कधी कधी घसरतो, आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचंय, अजित पवारांचा सल्ला
आणखी वाचा
Comments are closed.