12 वीच्या परीक्षेत कॉप्यांचा सुळसुळाट; शिक्षणमंत्री संतापले, म्हणाले, केंद्र प्रमुखांवर कारवाई
नाशिक : राज्यात 12 वी बोर्ड परीक्षेला 10 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून राज्य सरकारच्या कॉपीमुक्त (Copy) अभियानास पहिल्याच दिवशी हरताळ फासण्यात आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, परीक्षा केंद्रावरील अधिकारी आणि पर्यंवेक्षक विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले असून पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी, जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाईचे निर्देश दिले असताना आता, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनीही संबंधित केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येईल, तसेच पर्यवेक्षक आणि केंद्र अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.
परीक्षा केंद्रातील शाळांना सीसीटीव्ही लावणे इतर सुविधा, पाणी, बसेस वेळेवर पोहचल्या पाहिजे यांसह सर्वच निर्देश दिले होते. तरीही 12 वी परीक्षांत कॉपीच्या घटना घडल्याचं दिसलं. त्यामुळे, कॉपीच्या घटना समोर आलेल्या केंद्रावर रद्द बातलची कारवाई केली जाईल, यापुढे परवानगी दिली जाणार नाही. कॉपी करणाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि पालकांवरही कारवाई केली जाईल. ज्या शाळांनी पालन केले नाही, त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली.
कॉपीमुक्त परीक्षा अभियान
राज्यात बारावीच्या परीक्षा प्रगती पथावर आहेत, सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केलं होतं की, निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जा. गुरुजींनी ज्ञान दानाचे काम केलं आहे. मुख्यमंत्री यांनी मुलांना सूचना दिल्या होत्या, त्यानुसार कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविले जात आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाची जबाबदारी आहे. महसूल विभाग, गृह, ग्रामविकास विभागाचे सहकार्य घेतले जाते, आढावा बैठक घेतली जाते. मात्र, जिथं कॉपीचे प्रकार घडले तिथे कारवाई करण्यात येईल, असे दादा भुसेंनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात कॉप्यांचा सुळसुळाट
मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कॉपी प्रकरणे पुढे आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर (ता. कन्नड) येथे इयत्ता 12 वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघडकीस आला. परीक्षा केंद्रावरील CCTV फुटेज आणि उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे तब्बल 19 पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालकांवर कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. येथील दक्षता समितीचे अध्यक्ष तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित आणि विभागीय बोर्डाचे अध्यक्ष अनिल साबळे यांच्या आदेशानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात आली. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) श्रीमती अश्विनी लाठकर यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथकाने संपूर्ण तपास पूर्ण केला.
19 जणांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित
या प्रकरणात परीक्षा केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या पर्यवेक्षक शिक्षक आणि तिथल्या पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत. इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांवर संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा
शैक्षणिक कर्ज माहिती:
शैक्षणिक कर्ज EMI ची गणना करा
आणखी वाचा
Comments are closed.