बुलेटसाठी पतीकडून पत्नीचा छळ; कोर्टाने मंजूर केली दरमहा 20 हजारांची पोटगी
लग्नानंतर पत्नीला घरगड्यासारखे राबवणे, तिला सतत दोष देणे आणि बुलेट (रॉयल एनफिल्ड) खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपयांची हुंड्याची मागणी करीत शारीरिक व मानसिक छळ करणे हा गंभीर कौटुंबिक हिंसाचार आहे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण अंधेरी न्यायदंडाधिकारी नोंदवले. याचवेळी छळाचा सामना केलेल्या पत्नीला दरमहा 20 हजार रुपयांची पोटगी मंजूर केली.
अंधेरीतील शबनम दादा बाशा या महिलेच्या याचिकेवर न्यायालयाने हा निकाल दिला. पती दादू उर्फ मेहबूब बाशा याने याचिकाकर्त्या महिलेला दरमहा 20 हजार रुपये पोटगी, 15 हजार रुपये घरभाडे आणि 3 लाख रुपयांची भरपाई द्यावी, असे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले.
बेल्लारी (कर्नाटक) येथील कौटुंबिक न्यायालयात पतीने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. तेथे पतीची याचिका फेटाळली होती. त्यानंतर पतीने पत्नीला सोबत नेण्याचे मान्य केले. परंतु पत्नीला घरात घेतल्यावर केवळ ‘रॉयल एनफील्ड बुलेट’ गाडी खरेदी करण्यासाठी 6 लाख रुपयांची मागणी करत तिचा अमानुष छळ केला होता. पीडित महिला सासरच्या घरी गेल्यानंतर तिला अहोरात्र मोलकरणीसारखे राबवून घेण्यात आले आणि तिच्या दैनंदिन कामात सतत चुका काढून शेजाऱ्यांसमोर तिचा अपमान केला गेला. याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.
पीडित महिलेने 25 लाख रुपयांच्या भरपाईची मागणी केली होती. परंतु पतीचा फुलांचा आणि सावकारीचा व्यवसाय असून त्याचे मासिक उत्पन्न 70 ते 80 हजार रुपये आहे. त्यामुळे दोन्ही पक्षकारांचे राहणीमान लक्षात घेता 25 लाख ही रक्कम खूप जास्त ठरली असती. त्यानुसार न्यायालयाने 3 लाख रुपयांची भरपाई योग्य असल्याचे नमूद केले.
अंधेरी-पश्चिमेकडील जुहू गल्लीत राहणाऱ्या 27 वर्षीय शबनम यांचा विवाह 29 एप्रिल 2019 रोजी कर्नाटकच्या दादू उर्फ मेहबूब बाशा याच्याशी झाला होता. लग्नात मौल्यवान भेटवस्तू व दागिने देऊनही सासरच्यांकडून सोन्याचे दागिने आणि पैशांसाठी तगादा लावण्यात आला होता. कोविड काळात तिला जबरदस्तीने माहेरी पाठवले गेले आणि हुंडा दिल्याशिवाय परत घेण्यास नकार दिला होता. तसेच तिच्या पालकांसमोरही तिला मारहाण करण्यात आली. या छळाला कंटाळून विवाहितेने 6 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयात दाद मागितली होती.
Comments are closed.