मुंबईपेक्षा हैद्राबाद बरे! ‘स्पिरिट’चे शूटिंग मुंबईत न करण्यामागचे कारण सांगताना निर्माते म्हणाले…

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

साऊथ सुपरस्टार प्रभासचा आगामी ‘स्पिरिट’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून, चित्रपटाचे शूटिंग मुंबईऐवजी हैदराबादमध्ये केले जात आहे. आता निर्माते प्रणय रेड्डी वंगा यांनी ‘स्पिरिट’साठी हैदराबादची निवड करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.

प्रणय रेड्डी वंगा यांनी सांगितले की, हैदराबादमध्ये चित्रपटाचे शूटिंग करणे मुंबईच्या तुलनेत अधिक सोपे आणि कमी खर्चिक आहे. ‘ऑनेस्ट टाउनहॉल’मधील एका संवादादरम्यान त्यांनी मुंबई आणि हैदराबादमधील चित्रपट निर्मितीच्या खर्चातील फरकाबाबत भाष्य केले.

एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, “जर आम्ही रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ मुंबईत बनवला असता, तर कदाचित त्याच्या निर्मितीसाठी 20 ते 30 टक्के अधिक खर्च आला असता. त्यामुळे आम्ही किमान 20 ते 30 टक्के खर्च वाचवू शकलो असतो. म्हणूनच आता आम्ही प्रभासचा ‘स्पिरिट’ हैदराबादमध्ये बनवत आहोत.” प्रणय रेड्डी वंगा यांनी हैदराबादमध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ सहज उपलब्ध होत असल्याचेही सांगितले. त्यांच्या मते, एखादा सेट उभारायचा असेल किंवा शूटिंगसाठी काही विशेष व्यवस्था करायची असेल, तर त्यासाठी लागणारे साहित्य आणि इतर सुविधा सहज उपलब्ध होतात.

ते म्हणाले की, चित्रपट निर्मात्यांमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना असल्याने गरज पडल्यास एकमेकांना मदतही केली जाते. त्यामुळे हैदराबादमध्ये शूटिंगचे नियोजन आणि अंमलबजावणी तुलनेने सोपी होते. प्रणय रेड्डी वंगा यांनी मुंबई आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतील कामाच्या वेळांमधील फरकाबद्दलही माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम केले जाते. सकाळी 9 ते रात्री 9, सकाळी 10 ते रात्री 10 किंवा दुपारी 12 ते मध्यरात्री 12 अशा वेगवेगळ्या वेळांमध्ये शूटिंग सुरू करता येते. याउलट तेलुगू चित्रपटसृष्टीत शूटिंग साधारणपणे सकाळी 7 वाजता सुरू होते आणि संध्याकाळी 6 किंवा काही वेळा रात्री 9 वाजेपर्यंत चालते. हैदराबादमध्ये रात्रीच्या शूटिंगचे प्रमाणही तुलनेने कमी असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रणय रेड्डी वंगा यांच्या वक्तव्यामुळे ‘स्पिरिट’च्या मोठ्या बजेटचीही चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ सुमारे 200 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. त्यामुळे 20 ते 30 टक्के खर्च वाचल्यास मोठी रक्कम बचत होऊ शकते.

Comments are closed.