रजनीकांत यांच्यासोबत काम करताना मी खूप घाबरलो आहे!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दक्षिण भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांच्या आगामी ‘धर्मन’ या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. ‘जेलर 2 ‘सोबतच या चित्रपटाचीही जोरदार चर्चा सुरू असून, आता चित्रपटाचे दिग्दर्शक अश्वथ मरिमुथू यांनी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. अलीकडील मुलाखतीत अश्वथ मरिमुथू यांनी सांगितले की, रजनीकांत यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हा मोठा सन्मान असला, तरी त्याचवेळी ती प्रचंड जबाबदारीही आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल ते उत्साही असले तरी मनात भीती आणि दडपणही असल्याचे त्यांनी कबूल केले.

अश्वथ मरिमुथू म्हणाले, “धर्मन हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठा प्रकल्प आहे. जेव्हा मी या चित्रपटाबद्दल विचार करतो, तेव्हा मनात धाकधूक निर्माण होते. त्यामुळे मी रजनी सरांना सांगितले की, जास्त विचार करण्यापेक्षा प्रत्येक दिवसाचा आनंद घेत काम करत आहे. त्यांच्यासोबत काम करणे खूप सहज आणि प्रेरणादायी आहे. या चित्रपटात रजनी सरांचा दमदार स्वॅग आणि माझी वेगळी शैली प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.” असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

‘थलायवर 173 ‘ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या चित्रपटाचे शीर्षक आता ‘धर्मन’ असे निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला या चित्रपटाचे दिग्दर्शन दुसरे दिग्दर्शक करणार होते. मात्र, विविध कारणांमुळे प्रकल्पात बदल झाले आणि अखेरीस अश्वथ मरिमुथू यांच्याकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली. ‘धर्मन’मध्ये रजनीकांत एका धाडसी डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती कमल हसन करत आहे.

सध्या ‘धर्मन’चे चित्रीकरण चेन्नई येथे सुरू असून, हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. चाहत्यांना या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा असून, रजनीकांत आणि अश्वथ मरिमुथू यांची ही जोडी बॉक्स ऑफिसवर काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.