Mumbai Rain News – मुंबईला पावसाचा रेड अलर्ट; सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबईसह उपनगरांमध्ये आणि लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. अशातच आता हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला आहे. मुंबईत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना आज दुपारच्या सत्रात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अतिमुसळधार पावसामुळे मोगरा नाला तुडुंब भरून वाहत आहे. मोगरा नाला प्रणालीशी जोडलेले लहान नालेदेखील वाहत आहेत. परिणामी, परिसरातील काही रस्त्यांवर पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी विलंब होत आहे. तसेच, समुद्राला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ४.२६ मीटर इतकी भरती येणार आहे. त्यामुळे चेंबूर येथील नूर ए इलाही सेवा रस्ता, अंधेरी येथील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ रस्ता, अंधेरी येथील स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन आणि परेश पार्क बाजारपेठ येथील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी याची नोंद घेऊन या रस्त्यांवर प्रवास करणे टाळावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.