महालक्ष्मी उड्डाणपूल बनला मृत्यूचा सापळा, 18 गाड्यांचे टायर एका रात्रीत पंक्चर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेला महालक्ष्मी उड्डाणपूल सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. पहिल्याच पावसात मोठा खड्डा पडला असून लोखंडी गजदेखील बाहेर आले आहेत. या खड्ड्यामुळे एका रात्रीत 18 गाड्यांचे टायर पंक्चर झाले आणि वाहनचालक व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दैव बलवत्तर म्हणून मोठी दुर्घटना टळली. या खड्ड्याची तातडीने डागडुजी केली नाही तर मोठा अपघात घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील एक लेन तात्पुरती बंद केली आहे.

मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यासाठी तब्बल 620 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. यापूर्वीच्या डांबरी रस्त्यांवर पावसाळ्यात मोठमोठे खड्डे पडत असल्याचे आढळून आल्याने पर्याय म्हणून संपूर्ण मार्गाचेच काँक्रीटीकरण केले गेले. पण त्यानंतरही खड्डे पडण्याचे प्रकार सुरूच असून बुधवारी रात्री एक-दोन नव्हे तर 18 वाहनांना त्याचा फटका सहन करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद मार्गाची वाट लागली असून खड्डे पडल्याचे समजताच कासा व महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि ठेकेदाराने खडी व इतर साहित्य टाकून डागडुजी सुरू केली. पण त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

उड्डाणपुलांवर पाणी साचले

मागील वर्षी धानिवरी पुलावर खड्डे पडल्याने अनेक महिने वाहतूककोंडीचा सामना करावा लागला होता. यंदाही पहिल्याच पावसात उड्डाणपुलांवर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अजूनही अनेक ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण आहेत. महामार्ग प्राधिकरणाने कामांचे योग्य नियोजन न केल्याने दरवर्षी वाहनचालकांना अशा समस्यांना सामोरे जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान तातडीने दुरुस्ती हाती घेतली असून संबंधित ठेकेदाराला खड्डा बुजवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती महामार्ग प्रबंधक सुहास चिटणीस यांनी दिली.

Comments are closed.