सोलापुरातील वळसंगकर कुटुंबातील वाद आणखी चिघळला, जावयानंतर आता थेट सुनेवर गुन्हा दाखल, संपत्तीच्
Solapur Crime News Shirish Valasangkar: सोलापुरातील प्रसिद्ध आणि दिवंगत मेंदूरोगतज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (Shirish Valasangkar) यांच्या कुटुंबातील अंतर्गत गृहकलह आता पूर्णपणे विकोपाला गेला आहे. संपत्तीच्या वादातून कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांविरोधात पोलीस ठाण्याची पायरी चढली आहे. काही दिवसांपूर्वी जावयाच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आता थेट दिवंगत डॉक्टरांच्या सुनेच्या विरोधात देखील पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या पत्नी उमा वळसंगकर यांनी आपली सून डॉ. शोनाली वळसंगकर हिच्या विरोधात तक्रार दिली आहे.
Solapur Crime News Shirish Valasangkar: हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती प्रवेश आणि दमदाटी
डॉ. उमा वळसंगकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 18 जून रोजी सून डॉ. शोनाली वळसंगकर यांनी दिवंगत डॉ. वळसंगकर यांच्या मालकीच्या ‘एस. पी. न्युरो हॉस्पिटल’मध्ये जबरदस्तीने प्रवेश केला. यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये येण्यास अडवले असता, त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांना अश्लील शिवीगाळ केली, तसेच दमदाटी करून ‘बघून घेण्याची’ भाषा केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी डॉ. शोनाली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Solapur Crime News Shirish Valasangkar: संपत्तीवरून सुरू आहे वाद
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी आपली जीवनयात्रा संपवल्यानंतर त्यांच्या मागे असलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीच्या आणि हॉस्पिटलच्या मालकी हक्कावरून कुटुंबात मोठे वाद सुरू आहेत. याच वादातून काही दिवसांपूर्वी एक वेगळे वळण समोर आले होते. सून डॉ. शोनाली वळसंगकर यांनी आधी सासरचे लोक आणि दिवंगत डॉक्टर यांचे जावई सुजय फडके यांच्या विरोधात विनयभंग आणि घरात राहू दिले जात नसल्याची तक्रार केली होती.
Solapur Crime News Shirish Valasangkar: जावई सुजय फडके अजूनही फरार
डॉ. शोनाली यांच्या फिर्यादीनंतर जावई सुजय फडके यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता, तेव्हापासून सुजय फडके हे पोलिसांना गुंगारा देऊन फरार आहेत. मात्र, डॉ. शोनाली यांनी गुन्हा दाखल करताच, आता त्यांच्या सासू उमा वळसंगकर यांनी प्रतिआरोप करत सुनेविरुद्धच तक्रार दाखल केल्याने या प्रकरणाला नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. या हायव्होल्टेज कौटुंबिक वादामुळे सोलापूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Dr. Shirish Padmakar Valsangkar: कोण होते डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर?
डॉ. शिरीष पद्माकर वळसंगकर हे सोलापूरातील ख्यातनाम न्युरोफिजिशियन होते. वयाच्या 69व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आधुनिक न्यूरोलॉजी उपचारपद्धती आणि रुग्णसेवेतील योगदानामुळे त्यांची राज्यासह देशभरात वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज एस पी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस उभारण्यात आले. 1999 मध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयात न्यूरोलॉजीशी संबंधित निदान, उपचार, गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आणि संशोधनाची सुविधा उपलब्ध आहे. महाराष्ट्रकर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी हे रुग्णालय एक महत्त्वाचे उपचारकेंद्र मानले जाते. डॉ. वळसंगकर यांनी सोलापूरच्या दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स येथून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेज, सोलापूर येथून एमबीबीएस आणि एमडी पदवी मिळवली. पुढे त्यांनी लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन्स येथून MRCP (UK) ही प्रतिष्ठेची पदवी संपादन केली.
वैद्यकीय शिक्षणादरम्यान त्यांनी कोल्हापूरच्या सीपीआर हॉस्पिटल आणि कुर्डुवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात इंटर्नशिप केली. त्यानंतर डॉ. व्ही. एम. मेडिकल कॉलेजमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षण पूर्ण केले. पुढे लंडनमधील Maida Vale Neurological Hospital येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलमधून आपल्या वैद्यकीय कारकिर्दीची सुरुवात केली. मेंदूविकारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियांसंदर्भातील अनेक संशोधनपर शोधनिबंध त्यांनी देश-विदेशातील वैद्यकीय परिषदांमध्ये सादर केले होते. त्यामुळे देशातील आघाडीच्या न्यूरोलॉजिस्टमध्ये त्यांचा समावेश केला जात असे. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच त्यांना विमानचालनाचीही विशेष आवड होती. भारतभर प्रवास करण्यासाठी त्यांनी स्वतःचे खासगी विमान खरेदी केले होते. या विमानातून ते देशातील विविध भागांत प्रवास करत असत. तसेच अनेक प्रशिक्षणार्थी वैमानिकांना मार्गदर्शन करून त्यांनी विमानचालन क्षेत्रातही आपले योगदान दिले होते.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
Comments are closed.