Dapoli News – दापोली शहरातील केळसकर नाका परिसर पाण्याखाली ; चारचाकी वाहने पाण्यात फसली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

दापोली शहरातील केळसकर नाका हा प्रख्यात असा नाका आहे. हा केळसकर नाका शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून येथे अलिकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आलेला आहे. या पुतळ्याच्या बाजूनेच जोग नदी वाहते. या जोग नदीचे पाणी रस्त्यावर उलटल्याने केळसकर नाका परिसरात पाणीच पाणी झाले त्यामुळे दाभोळ जालगावकडून येणा-या मार्गावरील कित्येक वाहने पाण्यात फसली. त्यांना बाहेर काढताना वाहन चालकांसह अगदी मदत करणाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

दापोलीत जोरदार पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे तालुक्यातील नद्या ,नाले , परे, ओढे, ओहळ पाण्याने दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात अगदी सगळिकडेच पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे कुठे दरडी कोसळत आहेत तर कुठे माती भुसभुशीत झाल्याने मोठ मोठाली झाडेही आडवी पडली आहेत, घरांचीही काहीप्रमाणात पडझड झाली आहे ही नैसर्गिक आपत्ती नक्कीच आहे त्याला कुणाचीही ना असण्याचे कारण नाही मात्र दापोली शहराच्या शहरीकरण्याचा विस्तार हा झपाट्याने वाढत चालला आहे. शहरात ठिकठिकाणी उभ्या राहणाऱ्या मोठ मोठाल्या इमारती तसेच नैसर्गिक उगमस्थान असलेल्या पण कागदोपत्री निश्चित अशी विस्तारीची नोंद नसलेल्या जोग नदी पात्राचे अंतर न सोडताच धनदांडगे विकासक हे मोठ्याप्रमाणात इमारती बांधत आहेत गांधारीची डोळ्यावर पट्टी बांधलेले नगरपंचायत प्रशासन हे अशा भांडवलदार बडया हस्त्तींच्या कारनाम्याकडे सोयिस्करपणे डोळेझाक करतात मात्र निसर्ग आपली किमया आपले अस्तित्व दाखवतेच तसे दापोलीत दाखवून दिले आहे. कधी नव्हे ते अलिकडच्या काळात केळसकर नाक्यात शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जोग नदीचे पाणी उलटू लागले आहे. त्यामुळे दापोलीकडून जालगाव मार्गे दाभोळकडे जाणाऱ्या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जरा जरी पावसाची बरसात सुरू झाली आणि पुर परिस्थिती निर्माण झाली कि रस्त्यावर पाणी येतेच येते आणि मग या मार्गावर वाहने चालवताना धोक्याचे होते.

हे निसर्गनिर्मित नक्कीच नाही तर ही उद्भवत असलेली परिस्थिती ही मानवनिर्मितच आहे. कारण यापूर्वी असे या ठिकाणी पाणी भरले जात नव्हते असे शहरातील बुजुर्ग सांगतात . असो असे काही जरी असले दापोली शहरात कधी नव्हे ते रस्त्यावर पाणी भरले त्याचा त्रास शहरवासीयांना तर झालाच शिवाय जालगाव दाभोळ मार्गावरील गावातील प्रवासी वर्गांलाही तो सोसावा लागला ही परिस्थिती लक्षात घेऊन यापुढे तरी किमान नगरपंचायत प्रशासन या गंभीर समस्येचा विचार करू शहरातील नागरिकांना तसेच तालुका मुख्यालय असल्यामुळे तालुक्यातील लोकांना त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात भटकंती येथे दाखल होणाऱ्या पर्यटकांना आणि कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर शेतीची माहिती अवगत करण्यासाठी येणाऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. याची वेळीच दखल घेतली गेली नाहीतर दापोली शहरातील काही भाग दरवर्षी च्या पावसाळ्यात पाण्याखाली गेला तर कोणालाच काही नवल वाटायला नको. अशाप्रकारची परिस्थिती उद्भवू नये यासाठी नियमाना बगल न देता शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी नगर पंचायत प्रशासनाने काळजी घ्यायला हवी.

Comments are closed.