राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त व्हायला पाहिजे , त्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको – संजय राऊत
अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार आणि चोरीच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त करण्याची मागणी केली आहे. राम मंदिर ट्रस्ट हा पूर्णपणे एकपक्षीय झाला असून तो भाजपचा ट्रस्ट बनला आहे. त्याच्यामध्ये इतर कोणी नाहीये, सगळे चोर एकत्र आणलेले आहेत असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राम मंदिरासाठी मुंबई आणि महाराष्ट्राने बलिदान व त्याग केला असल्याची आठवण करून देत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. सरकार तुमचेच असतानाही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही, असा आरोप त्यांनी केला. एखाद्या गुन्ह्यात जेव्हा पाचपेक्षा किंवा पाच लोकं सहभागी असतात, तेव्हा ती चोरी नसते तो दरोडा असतो. इथे पाचपेक्षा जास्त लोकं आहेत, त्याच्यामुळे राम मंदिरावर दरोडा पडलाय आणि हे एका-दुसऱ्या माणसाचं काम नाही. कारवाई संपूर्णराम मंदिराचा ट्रस्ट आहे, त्यांच्यावर व्हायला पाहिजे. कारण ते कर्तव्यास मुकलेले आहेत, ते कर्तव्यास चुकलेले आहेत असे संजय राऊत म्हणाले.
शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिरातल्या लुटीविरोधात आंदोलनाची घोषणा केल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ताबडतोब पुढे येऊन आपली भूमिका मांडली, आधी का नाही मांडली? कारण त्यांना माहित आहे या आंदोलनाची महाराष्ट्रात जर ठिणगी पडली तर त्याचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे राम मंदिर ट्रस्ट पूर्णपणे बरखास्त व्हायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एकपक्षीय ट्रस्ट नको. हा भाजपचा ट्रस्ट झालेला आहे, त्याच्यामध्ये इतर कोणी नाहीये, सगळे चोर एकत्र आणलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपच्या बाजूने बोलू नये, त्यानं रामभक्तांच्या बाजूने बोलावं. दुर्दैवानं ते भारतीय जनता पक्षाची कातडी वाचवण्यासाठी स्वतःची ढाल देत आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेचं आंदोलन उद्या आहे, उद्या सुरू होतंय. मुंबईमध्ये त्याची सुरुवात आहे, महाराष्ट्रामध्ये आंदोलन पसरणार आणि त्यानंतर देशभरामध्ये सुद्धा या आंदोलनाला सुरुवात होऊ शकते. तुम्हाला माहितीये का काय काय झालंय अयोध्येमध्ये? फक्त 550 कोटींच्या देणग्यांवर डल्ला नाहीये. प्रभू श्रीरामाची सर्व आभूषणं चोरीला गेलेली आहेत. प्रभू श्रीरामाचा मुकुट चोरीला गेलेला आहे. प्रभू श्रीरामाच्या गळ्यातला कंठातला हार चोरीला गेलेला आहे. सीतामाईची कर्णफुलं चोरीला गेलेली आहेत. सीतामाईच्या गळ्यातला हार चोरीला गेलेला आहे. ज्या पादुका भरताने 14 वर्षे सांभाळल्या, त्या रामाच्या पादुकाही चोरीला गेलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणताय की संयम आणि धैर्य पाळा. आता संयमाचा बांध तुटलाय, आता तो पाळू शकत नाही. उद्यापासून आमचे आंदोलन सुरू होईल. आणि हे कोणतेही राजकीय आंदोलन नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील सर्व हिंदूंना आवाहन केले आहे, मग ते कोणत्याही पक्षातील असोत, मग ती काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, किंवा कम्युनिस्ट असोत, ज्यांना असे वाटते की राम आमचा आहे, रामाशी आमचे काही नाते आहे, त्या सर्वांनी या आंदोलनात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षाने उत्तर प्रदेशात आंदोलन सुरू केले आहे, आम आदमी पक्षानेही सुरू केले आहे, महाराष्ट्रात हे सर्व लोक येत्या काही दिवसांत एका मोठ्या मंचावर येऊ शकतात असेही संजय राऊत म्हणाले.
या संघर्षात रामजन्मभूमी आंदोलनातील जुने नेते विनय कटियार यांचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले की, विनय कटियार हे रामजन्मभूमी आंदोलनातले त्या काळातले एक महत्त्वाचे मराठी होते. जेव्हा पहिली कारसेवा झाली तेव्हा मी तिथे होतो. विनय कटियार आणि मी संपूर्ण अयोध्या तेव्हा पालथी घातली होती,. त्यानंतर माझं लिखाण त्याच्यावर प्रसिद्ध झालेलं आहे. विनय कटियार आणि त्यांचं बजरंग दल यांचा फार मोठा सहभाग त्यावेळेला होता. पण गेल्या काही काळापासून विनय कटियार यांना सुद्धा अयोध्येतून दूर जावं लागलं, कारण एका विशिष्ट टोळीनं अयोध्येचा ताबा घेतला. आणि मग विनय कटियार असतील, असे अनेक काही लोक आहेत, प्रमुख संत दुबेश आहेत, त्यांना अयोध्येतून बाहेर काढण्यात आलं.” “आता हे सगळे लोक परत आलेले आहेत, आणि या सगळ्यांनी राम मंदिराच्या दानपेटीच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढाई सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनय कटियार यांच्याशी बोलावे लागेल. आजही विनय कटियार यांचं अयोध्येमध्ये फार वजन आहे, आजही त्यांना मानणारा मोठा कार्यकर्त्यांचा समूह आहे आणि सच्चा माणूस आहे असेही संजय राऊत म्हणाले.
राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आणि ट्रस्टी हे भक्तांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी पळून जातायत
सरसंघचालकांनी त्यांच्यावतीनं, त्यांचे प्रमुख नेते संघाचे दत्तात्रेय होसबळे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, ती पुरेशी आहे. पण मी असं पाहिलं की राम मंदिर ट्रस्टचे जे खजिनदार आहेत गोविंद गिरी, त्यांनाही याविषयी प्रश्न विचारला तेव्हा तेही हात जोडून पळून गेले. आपण लोकांना सामोरे का जात नाही आहात या विषयावर? हजारो, लाखो, करोडो रामभक्तांची आस्था तुम्ही पायी तुडवलेली आहे, त्याची लूट झालेली आहे. आणि राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार आणि ट्रस्टी हे भक्तांच्या प्रश्नांना उत्तरं देण्याऐवजी पळून जातायत, याचा अर्थ ‘दाल में कुछ काला’ आहे. फक्त काला नाहीये, अख्खी दाल काली आहे. असेही संजय राऊत म्हणाले.
Comments are closed.