पतीला खिरीतून गुंगीचे औषध देऊन गळा आवळला; बाथरुमखाली पुरुन लाद्या बसवल्या, 45 दिवसांनी भयंकर घट
आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील सिकंदरा परिसरातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका लग्न झालेल्या महिलेने अत्यंत क्रूरपणे स्वतःच्या पतीचा काटा काढला. इतकेच नव्हे तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह घराच्या बाथरूमच्या जमिनीखाली गाडून त्यावर सिमेंटचा थर लावून फरशी घालून बथरूम तयार करून घेतलं. तब्बल ४५ दिवस ही महिला पती हरवल्याचे नाटक करत नातेवाईक आणि पोलिसांची दिशाभूल करत होती. मात्र, एका जुन्या प्रकरणाच्या पोलीस पडताळणी दरम्यान (Routine Verification) या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे.
UP crime news : मुलींना पाठवले बाहेर; खिरीत दिली गुंगीची औषधे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत ४४ वर्षीय सुरेंद्र शर्मा हे आपली पत्नी रूबी शर्मा आणि दोन मुलींसह सिकंदरा येथील रेणुका धाम (दहतोरा) कॉलनीत राहत होते. १८ मे रोजी अचानक सुरेंद्र बेपत्ता झाले. या हत्येच्या दिवशी रूबीने अत्यंत थंड डोक्याने कट रचला होता. तिने आधी दोन्ही मुलींना सुरेंद्र यांच्या मोठ्या भावाच्या घरी पाठवून दिले. त्यानंतर घरात कोणी नसताना तिने सुरेंद्र यांना रात्री खिरीमध्ये गुंगीच्या गोळ्या मिसळून दिल्या. सुरेंद्र बेशुद्ध पडल्यानंतर तिने त्यांचा गळा आवळून जीव घेतला.
UP crime news : बाथरूममध्ये खणला खड्डा; मिस्त्री बोलावून वरून टाकला सिमेंटचा फर्श
हत्या केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रूबीने बाथरूममध्ये एक मोठा खड्डा खणला. धक्कादायक बाब म्हणजे, तिने या कामासाठी आधीच मिस्त्री आणि मजूर बोलावून पूर्वतयारी केली होती. तिने सुरेंद्र यांचा मृतदेह त्या खड्ड्यात गाडला आणि मिस्त्रीकडून वरून पुन्हा सिमेंट टाकून नव्या फरश्या बसवून बाथरूम तयार करून घेतलं, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर नातेवाईक किंवा शेजाऱ्यांनी विचारल्यास, “ते कुठेतरी निघून गेले आहेत, लवकरच परत येतील” असे सांगत ती नाटक करत राहिली. २६ मे रोजी सिकंदरा पोलीस ठाण्यात सुरेंद्र यांची अधिकृत बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती.
UP crime news :पोलीस व्हॅरिफिकेशन आणि भावाच्या संशयाने सुटला गुंता
हे हत्याकांड तब्बल दीड महिना जगापासून लपून राहिले. मात्र, एका जुन्या प्रकरणात सुरेंद्र यांच्याशी संबंधित कागदपत्रांच्या नियमित पडताळणीसाठी (Verification) पोलिसांचे एक पथक अचानक त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांच्या चौकशी दरम्यान रूबी प्रचंड घाबरली आणि तिची वर्तणूक संशयास्पद वाटू लागली. तिने तातडीने आपल्या दिराला (सुरेंद्र यांचे भाऊ अनिल शर्मा) घरी बोलावून घेतले.
अनिल शर्मा यांना आधीपासूनच भाऊ अचानक गायब होण्यावर आणि रूबीच्या वेगवेगळ्या वक्तव्यांवर संशय होता. त्यांनी बँकेचे रेकॉर्ड तपासले होते आणि ते स्वतःच्या पातळीवर शोध घेत होते. अनिल यांनी घरात आल्यावर रूबीला थेट विचारले, “सुरेंद्र कुठे आहेत?” त्यावर तिने आधी ‘घरातच आहेत’ असे सांगितले. पुन्हा ‘कुठे?’ असे विचारल्यावर तिने “बाथरूमच्या फर्शखाली” अशी कबुली दिली. अनिल यांनी तात्काळ ही माहिती तिथे हजर असलेल्या पोलिसांना दिली. पोलिसांनी रूबीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली.
UP crime news : बाथरूमचा फरशी तोडला अन्…
रूबीने दाखवलेल्या जागेवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बाथरूमचा सिमेंटचा फर्श तोडला. खालील माती बाजूला केल्यावर पोलिसांना सुरेंद्र शर्मा यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. ज्या व्यक्तीचा शोध संपूर्ण कुटुंब ४५ दिवसांपासून घेत होते, तो घरातच दफन असल्याचे पाहून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवला आहे.
UP crime news : शेजारी आणि पोलिसांसमोर अनेक प्रश्न
हरिपर्वात सर्कलच्या एसीपी अमिषा यांनी सांगितले की, २६ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार आली होती, मात्र तपासात पत्नीनेच खून करून मृतदेह बाथरूमखाली लपवल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, या पती-पत्नीमध्ये दारू पिण्यावरून आणि इतर कारणांमुळे नेहमी घरगुती भांडणे होत असत. आता पोलिसांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या हत्येच्या कटात रूबीसोबत इतर कोणी सामील होते का? तसेच ज्या मिस्त्री आणि मजुरांना बोलावले होते, त्यांना फक्त दुरुस्तीचे काम सांगण्यात आले होते की त्यांनाही या कटाची माहिती होती? पोलीस सध्या फॉरेन्सिक टीमच्या मदतीने, शवविच्छेदन अहवाल आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे या सर्व प्रश्नांचा सखोल तपास करत आहेत. आरोपी रूबी शर्मा सध्या पोलीस कोठडीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
Comments are closed.