मी घाबरलो नव्हतो, मला पाहायचे होते नेमकं काय घडतंय; गोळीबाराच्या घटनेवर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

शनिवारी रात्री व्हाइट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनच्या डिनर दरम्यान हॉटेलच्या बॉलरूमबाहेर गोळीबाराची घटना घडली होती. यावरच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, या घटनेनंतर सुरक्षा रक्षक जेव्हा बाहेर नेत होते, तेव्हा आपल्याला नक्की काय घडत आहे, हे स्वतः पाहायचे होते.

सीबीएसच्या ‘६० मिनिट्स’ कार्यक्रमाला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलमधील गोळीबाराच्या घटनेवर भाष्य केले आहे. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर आपल्याला काळजी वाटली होती का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “मी घाबरलो नव्हतो. मला जीवनाची समज असून आजच्या जगात काहीही होऊ शकते.”

ट्रम्प यांनी पुढे सांगितले की, त्यांना स्वतःला काय घडत आहे, हे पाहायचे होते. कदाचित यामुळेच सीक्रेट सर्व्हिसच्या कर्मचाऱ्यांना त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यास वेळ लागला. “मी त्यांच्याशी सहकार्य करत नव्हतो कारण मला नेमकं काय सुरू आहे हे जाणून घ्यायचे होते. हळूहळू जेव्हा गोष्ट लक्षात आली, तेव्हा समजले की, हा बॉलरूमचा आवाज नसून काहीतरी गंभीर प्रकार आहे,” असे त्यांनी म्हटले.

घटनेची आठवण सांगताना ट्रम्प म्हणाले की, “मी एका सतर्क टीमच्या भक्कम वेढ्यात होतो, पण खरं सांगायचं तर मी त्यांच्या अडचणी वाढवल्या. मी वारंवार त्यांना ‘थांबा, एक मिनिट थांबा’ असे म्हणत होतो.”

हल्लेखोराने त्याच्या कुटुंबाला पाठवलेल्या संदेशात ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या विधानावर प्रश्न विचारला असता ते संतापले. ट्रम्प म्हणाले, “तो एक मानसिक आजारी माणूस आहे. ‘६० मिनिट्स’ सारख्या कार्यक्रमात अशा गोष्टी वाचणे शोभत नाही. माझा अशा गोष्टींशी कोणताही संबंध नाही आणि मी पूर्णपणे निर्दोष सिद्ध झालो आहे.” मुलाखतीच्या शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशनला पुढील ३० दिवसांच्या आत हे डिनर पुन्हा आयोजित करण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.