आयसीसीचा मोठा निर्णय! क्रिकेटचे नियम बदलले, आता फलंदाजांना वेळ वाया घालवणं पडणार महागात

क्रिकेटमध्ये आता फलंदाजांच्या प्रत्येक विलंबावर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. जर एखादा फलंदाज वारंवार पुढील चेंडूसाठी वेळेत तयार होत नसेल आणि त्यामुळे खेळाला उशीर होत असेल, तर त्याची किंमत संघाला 5 धावा गमावून चुकवावी लागू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (International cricket Council) म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत. हे बदल 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू असणार आहेत.

नवीन नियमानुसार, एखादा फलंदाज एका डावात तीन वेळा वेळ वाया घालवत असल्याचे आढळल्यास, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा दिल्या जातील. पहिल्या चुकीवर फलंदाजाला ताकीद दिली जाईल, तर दुसऱ्या वेळी अंतिम ताकीद दिली जाईल. तिसऱ्या वेळेनंतर पुन्हा प्रत्येक वेळी अशी चूक झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा मिळतील. आयसीसीच्या नियमानुसार, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ पुढील चेंडूसाठी तयार झाल्यानंतर फलंदाजानेही पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार असणे आवश्यक आहे.

नवीन नियमानुसार, पहिल्याच चुकीवर फलंदाजाच्या संघाला थेट 5 धावांचा फटका बसणार नाही. गोलंदाजाच्या बाजूचा पंच पहिल्या वेळी फलंदाजाला ताकीद देईल आणि नॉन-स्ट्रायकर, मैदानावर येणारा फलंदाज, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार आणि दुसऱ्या पंचाला याची माहिती देईल. दुसऱ्यांदा अशीच चूक झाल्यास ही प्रक्रिया पुन्हा केली जाईल; मात्र यावेळी ती अंतिम ताकीद मानली जाईल. तिसऱ्यांदा आणि त्यानंतर प्रत्येक वेळी उशीर झाल्यास पंच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा देतील.

बहुदिवसीय क्रिकेटमध्ये या ताकीदांचा हिशोब संपूर्ण डावभर सुरू राहणार नाही. 80 षटके पूर्ण झाल्यानंतर ताकीदांचा हिशोब पुन्हा शून्य होईल. त्यानंतर प्रत्येक नवीन 80 षटकांच्या टप्प्यासोबत ही प्रक्रिया पुन्हा सुरू होईल.

आयसीसीने महिला क्रिकेटसाठीही एक महत्त्वाचा बदल केला आहे. आता महिला क्रिकेट आणि ज्युनियर क्रिकेटमध्ये एकाच प्रकारच्या चेंडूचा वापर करण्याची व्यवस्था राहणार नाही. आयसीसीने पुरुष, महिला आणि ज्युनियर क्रिकेटसाठी चेंडूचा आकार आणि वजन यासाठी तीन वेगवेगळ्या मर्यादा निश्चित केल्या आहेत.

रनआउट आणि स्टम्पिंगच्या नियमातही स्पष्टता करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक किंवा यष्टिरक्षकाच्या ताब्यात चेंडू पूर्णपणे असणे आवश्यक असेल. केवळ चेंडूला स्पर्श करून स्टम्प उखडणे पुरेसे मानले जाणार नाही. याशिवाय, दिवसाच्या कसोटी सामन्यात गुलाबी चेंडूचा वापर हा देखील अधिकृतपणे उपलब्ध पर्यायांमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

Comments are closed.