ICC 2027 वनडे वर्ल्डकपचा महासंग्राम; ऑस्ट्रेलियाच्या आव्हानानंतर पाकिस्तानची ‘हवा’ काढायला हिंदुस्थान सज्ज!
ज्या स्पर्धेच्या वेळापत्रकाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते, त्या ICC ODI Men’s World Cup 2027 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. हिंदुस्थानचा समावेश अ-गटात करण्यात आला आहे. हिंदुस्थानचा संघ 7 ऑक्टोबर रोजी केपटाऊनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. कांगारुंचा फडशा पाडत संघ पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि क्वालिफार संघाला भिडणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोहिमेची सुरुवात केल्यानंतर हिंदुस्थानचा पुढचा सामना म्हणजेच महामुकाबला 10 ऑक्टोबर रोजी जोहान्सबर्ग येथे पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. त्यानंतर हिंदुस्थानचे पुढील सामने अफगाणिस्तान (14 ऑक्टोबर), क्वालिफायर संघ (17 ऑक्टोबर) आणि यजमान झिम्बाब्वेविरुद्ध (24 ऑक्टोबर) खेळवले जातील. पुढील टप्प्यात (Super 7) प्रवेश करण्यासाठी संघाला आपल्या गटात पहिल्या तीन स्थानांमध्ये राहणे अनिवार्य असणार आहे. सध्या वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला हिंदुस्थानचा संघ 2025 पासून शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. 2023 मध्ये उपविजेतेपद आणि त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवल्यानंतर, नुकताच वेस्ट इंडिजविरुद्ध 406 धावांचा ऐतिहासिक पाठलाग करत संघाने आपला फॉर्म सिद्ध केला आहे. 14 संघांच्या सहभागासह खेळवल्या जाणाऱ्या या नव्या स्वरूपातील विश्वचषकात हिंदुस्थान पुन्हा एकदा जेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून मैदानात उतरेल.
Comments are closed.