ODI WC 2027: थेट पात्र होण्यासाठी आयसीसीची अंतिम तारीख जाहीर, दोन वेळेचा विजेता मुकणार स्पर्धेला?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) काही दिवसांपूर्वीच 2027 च्या वनडे विश्वचषकाचे बदलते स्वरूप जाहीर केले. आयसीसीने या स्पर्धेत पात्र होण्याची प्रक्रिया आणि अंतिम मुदत स्पष्ट केले आहे. आयसीसीच्या या नियमामुळे, दोन वेळेचा विश्वविजेता ठरलेल्या संघावर पुन्हा एकदा स्पर्धेतून बाहेर पडण्याची धोका निर्माण झाल आहे.

आयसीसीने थेट पात्रतेसाठी 30 सप्टेंबर, 2026 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. या तारखेपर्यंत आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल संघांना थेट प्रवेश मिळणार आहे. त्याप्रमाणे आठ संघांनी आपली जागा निश्चित केली आहे. यामध्ये मात्र दोन वेळेचा विश्वविजेता वेस्ट इंडिजचा समावेश नाही. यामुळे तो पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकात खेळू शकणार की नाही, हे सध्यातरी निश्चित नाही.

कोण ठरले थेट पात्र?
या विश्वचषकासाठी थेट पात्रतेचे नियम आधीच स्पष्ट केले गेले. त्यानुसार यजमानपद भुषवणारे पूर्ण सदस्य देश थेट पात्र ठरतात. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी 2027 साठी आपले स्थान निश्चित केले आहे.

त्याचबरोबर भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि इंग्लंड संघ सध्याच्या क्रमवारीनुसार थेट पात्र ठरतील. या संघांची क्रमवारी पाहिली तर त्यांचे स्पर्धेतील स्थान जवळपास निश्चित आहे. तसेच ताज्या क्रमवारीनुसार अफगाणिस्तान आठव्या आणि बांग्लादेश नवव्या क्रमांकावर आहेत. हे या स्पर्धेत नववे आणि दहावे स्थान मिळवण्याची अधिक शक्यता आहे. असे झाले तर वेस्ट इंडिजचा प्रवेश धोक्यात आला आहे.

विंडीजची स्थिती
वेस्ट इंडिज सध्या क्रमवारीमध्ये दहाव्या स्थानी आहे. जर त्यांनी 30 सप्टेंबरआधी आपल्या क्रमवारीमध्ये सुधारणा नाही केली, तर त्यांना स्पर्धेत थेट पात्र होता येणार नाही. तसे झाले तर त्यांना पुन्हा एकदा आव्हानात्मक पात्रता फेरीचा सामना करावा लागेल.

वेस्ट इंडिज मागील विश्वचषकात म्हणजे 2023 मध्येही पात्र ठरला नव्हता. आयसीसीची मुदत पाहिली तर तोपर्यंत वेस्ट इंडिजला केवळ तीन सामने खेळता येणार आहेत. यामधील एक सामना न्यूझीलंड विरुद्ध तर दोन सामने भारताविरुद्ध आहेत.

वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली आहे, मात्र आता स्थिती इतकी कठीण आहे की ते पात्र ठरण्यासाठीही झगडत आहेत. (ICC ODI World cup 2027 cut off date for qualification two-time champion west indies in trouble)

Comments are closed.