वैभव सूर्यवंशी क्रिकेटचा नवा सुपरस्टार? ‘या’ खेळाडूची मोठी भविष्यवाणी

टीम इंडियाचा युवा स्टार वैभव सूर्यवंशीला इंग्लंड दौऱ्यावर धावा करता आल्या नाहीत, तरीही त्याच्या गुणवत्तेवर सर्वांचा विश्वास कायम आहे.

झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने (Sikandar Raza on vaibhav suryavanshi) वैभवचे कौतुक करताना म्हटले आहे की, जर त्याला योग्य मार्गदर्शन मिळाले, तर भविष्यात तो क्रिकेट जगतात मोठा बदल घडवून आणणारा खेळाडू ठरू शकतो. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यात 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी रझाने सांगितले की, इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे हीच मोठी गोष्ट आहे आणि फक्त 2-3 सामन्यांवरून एखाद्या खेळाडूवर टीका करणे चुकीचे आहे.

रझाने ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले की, वैभव अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. 15 वर्षांच्या मुलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे आणि अवघ्या काही सामन्यांनंतर त्याची आलोचना करणे योग्य नाही. त्याच्या आसपास अनेक अनुभवी खेळाडू आहेत. जर त्याचे योग्य व्यवस्थापन आणि मार्गदर्शन झाले, तर तो येत्या काळातील सर्वात मोठा खेळाडू बनू शकतो.

इंग्लंड दौऱ्यावर वैभवची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने तीन सामन्यांत अनुक्रमे 14, 13 आणि 15 धावा केल्या. यातील दोन वेळा तो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या शॉर्ट बॉलवर बाद झाला. या मालिकेत भारताला इंग्लंडविरुद्ध 0-4 ने पराभव पत्करावा लागला.

इंग्लंडमध्ये अपयशी ठरल्यानंतर आता वैभव अशा मैदानावर परतत आहे, जिथे त्याने काही महिन्यांपूर्वी आपल्या फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले होते. जानेवारीमध्ये हरारे येथे झालेल्या अंडर-19 विश्वचषक अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध फक्त 80 चेंडूंमध्ये 175 धावांची विस्फोटक खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. या मालिकेत संजू सॅमसन संघात नसल्यामुळे वैभवला डावाची सुरुवात करण्यासाठी सतत संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या एका वर्षात वैभवने मिळवलेले यश कोणत्याही तरुण खेळाडूसाठी अप्रतिम असल्याचे रझाचे म्हणणे आहे.

Comments are closed.