टी20 रँकिंगमध्ये मोठा उलटफेर! भारताला पछाडत इंग्लंड पहिल्या स्थानावर; टीम इंडियाची कामगिरी घसरली

नुकतीच टीम इंडिया आणि इंग्लंड संघामध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका पार पडली ज्यामध्ये भारताला पुन्हा निराशा पचवावी लागली त्यामुळे आता 4 वर्षांनंतर भारताकडून टी20 रँकिंगची बादशाहत हिरावली गेली आहे.

आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे भारतीय संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. भारताला 4-0 ने पराभूत केल्यामुळे इंग्लंडला आयसीसी टी20 टीम रँकिंगमध्ये मोठा फायदा झाला आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने विचार करता, जागतिक स्तरावरील सर्व संघांमध्ये रँकिंगमध्ये वरच्या क्रमांकावर राहण्याची चढाओढ लागली आहे.

याचं कारण म्हणजे, 31 डिसेंबर 2026 रोजी आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओशिनिया या खंडांतील जे संघ आपापल्या खंडात अव्वल स्थानी असतील, त्यांना ऑलिम्पिकचे तिकीट मिळेल. त्यामुळे वर्षाच्या शेवटपर्यंत आपापल्या खंडात अव्वल राहण्यासाठी सर्वच संघ प्रयत्नशील आहेत.

टी20 रँकिंगमधील टॉप-10 संघ!

भारताला 4-0 ने हरवून इंग्लंड आता जगातील नंबर 1 संघ बनला आहे, तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. टॉप-10 मध्ये इतर कोणत्याही देशाच्या रँकिंगमध्ये बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान सध्या सहाव्या स्थानावर आहे.

इंग्लंड
भारत
ऑस्ट्रेलिया
न्यूझीलंड
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
वेस्ट इंडिज
बांगलादेश
श्रीलंका
अफगाणिस्तान

भारतीय संघ तब्बल साडेचार वर्षांनंतर टी20 रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावरून खाली आला आहे. फेब्रुवारी 2022 पासून भारत जगातील नंबर 1 टी20 संघ होता. या काळात रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वाखाली भारताने 2024 आणि 2026 चे टी20 वर्ल्ड कप जिंकले होते.

टी20 वर्ल्ड कप 2026 नंतर सूर्यकुमार यादवच्या जागी श्रेयस अय्यरकडे (Shreyas Iyer) टी20 संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. अय्यरने यूके दौऱ्यावर पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले, पण दुर्दैवाने कर्णधार म्हणून त्याला पहिल्या 7 सामन्यांत एकही विजय मिळवता आला नाही. आयर्लंडकडून 0-2 आणि इंग्लंडकडून 0-4 अशी मालिका हरल्याचा फटका टीम इंडियाला रँकिंगच्या स्वरूपात सहन करावा लागला आहे.

Comments are closed.