आयसीआयसीआय बँकेत मिनिमम बॅलन्स रक्कम वाढवली, 10 हजार नव्हे खात्यात 50 हजार शिल्लक ठेवावे लागणार
मुंबई : आयसीआयसीआय बँक हे देशातील दुसऱ्या क्रमांकाची खासगी क्षेत्रातील बँक आहे. बँकेनं बचत खात्यांमध्ये किमान सरासरी शिल्लक रक्कम किती ठेवायची याबाबतचे नियम बदलले आहेत. तब्बल पाच पट वाढ केल्याचं समोर आलं आहे. हे नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आयसीआयसीआय बँकेकडून करण्यात आलेले बदल 1 ऑगस्ट 2025 नंतर उघडण्यात आलेल्या बँक खात्यांना लागू असतील. यामुळं सर्वाधिक मिनिमम सरासरी शिल्लक रक्कम ठेवण्यामध्ये आयसीआयसीआयनं नवा मापदंड निर्माण केला आहे. नव्या बदलांनुसार आयसीआयसीआय बँकेच्या मेट्रो आणि शहरी भागातील खात्यात आता 50000 रुपये शिल्लक ठेवावे लागणार आहेत. यापूर्वी ही रक्कम 10 हजार रुपये इतकी होती.
निमशहरी भागातील शाखेतील बँक खात्यासाठी किमान सरासरी शिल्लक 5000 रुपयांवरुन 25000 रुपये करण्यात आली आहे. तर, ग्रामीण भागातील खात्यांसाठी किमान शिल्लक 2500 रुपयांवरुन 10000 रुपये करण्यात आली आहे. जे बँक खातेदार किमान सरासरी शिल्लक रक्कम त्यांच्यात खात्यात ठेवणार नाहीत त्यांना बँकेकडून 6 टक्के दंड किंवा 500 रुपये जी कमी रक्कम असेल तितकं शुल्क आकारलं जाईल. समजा एखाद्या मेट्रोमधील बँक खातेदाराच्या बँकेत 50 हजार रुपये शिल्लक ठेवण्यास 10000 रुपये कमी पडत असतील तर दंड 600 रुपये होतो. मात्र, किमान दंड 500 रुपये द्यावा लागेल.
बँकेनं रोख रक्कम जमा करण्यासंदर्भातील नियम देखील बदलले आहेत. तीन वेळा कोणत्याही शुल्काशिवाय रक्कम जमा करण्यात दरमहा जमा करण्यात येईल, त्याची मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत असेल. यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 150 रुपये आकारले जातील. किंवा एक हजारांसाठी 3.50 रुपये जे अधिक असेल ते आकारलं जाईल. चेक परत पाठवण्याची फी 200 रुपये निश्चित करण्यात आली आहे. चेक परत घेण्यासाठी 500 रुपयांचं शुल्क आकारलं जाईल.
एचडीएफसी बँकेनं किमान सरासरी शिल्लक रक्कम मेट्रो आणि शहरी भागासाठी 10 हजार रुपये ठेवलं आहे. तर, निमशहरी शाखांसाठी 5000 आणि ग्रामीण शाखांसाठी 2500 रुपये किमान शिल्लक रक्कम ठेवण्यात आली आहे. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियानं किमान शिल्लक रक्कम शुल्क 2020 पासून रद्द केलं आहे. अनेक बँकांची किमान शिल्लक रक्कम 2000 ते 10 हजार रुपयांदरम्यान आहे. स्टेट बँकेनंतर काही बँकांनी किमान शिल्लक रक्कम शुल्क रद्द केलं आहे. आयसीआयसीआय बँकेच्या या नियम बदलाचा फटका किंवा परिणाम विद्यमान खातेदारांवर होणार नाही. जे नव्यानं खातं उघडणार आहेत त्यांना इतकी रक्कम खात्यात शिल्लक ठेवावी लागेल. बँकेचा श्रीमंत ठेवादर सोबत ठेवण्याचा या निमित्तानं प्रयत्न दिसतो.
आणखी वाचा
Comments are closed.