दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी राजीनामा देईन म्हणणारे प्रशांत जगताप शरद पवारांच्या भेटीला


Pune News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध राजकीय समीकरणे तयार होताना दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरद पवार गटातील कार्यकर्ते काही ठिकाणी एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचंही दिसून आलं. स्थानिक पातळीवरील नेत्यांनी याबाबतच्य घोषणा केल्या होत्या. अशीच समीकरणे येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीतही पाहायला मिळू शकतात. मात्र, या शक्यतेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी काही दिवसांपूर्वी ठाम विरोध दर्शवला होता. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन असा पवित्रा त्यांनी घेतला होता, त्यानंतर आज प्रशांत जगताप शरद पवारांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Jagtap : मी शरद पवारांना आज एक अहवाल देणार

आज शरद पवारांनी प्रशांत जगताप यांना भेटीसाठी बोलवलं आहे. काही वेळात प्रशांत जगताप हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर मी राजीनामा देईन, राजकारणातून बाहेर पडेन असं प्रशांत जगताप यांनी म्हटलं होतं. प्रशांत जगताप आणि शरद पवार यांच्या भेटीत काय होतं? ते पुणे राष्ट्रवादीसाठी महत्वाचं असणार आहे. भेटीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मी दोन्ही पक्षात काम केलं आहे. मी शहरात कार्यकर्त्यांचं संघटन बांधलं आहे. शरद पवार हे आमचं श्रद्धास्थान आहेत, त्यांची साथ निभवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. पुणेकर महाविकास आघाडी म्हणून आम्हाला नक्की मतदान करतील. महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडत आहे. मी शरद पवारांना आज एक अहवाल देणार आहे. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय होईल इतर कुठल्या पक्षांसोबत गेलो तर निवडणुकीत काय होईल याचा लेखाजोखा आज मी त्यांच्यासमोर मांडणार आहे, शरद पवार हे योग्य तो निर्णय घेतील, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये हीच इच्छा असल्याचंही प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे.

Prashant Jagtap : काय म्हणाले होते जगताप?

प्रशांत जगताप म्हणाले होते की, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून बाहेर पडेन.अजित पवार यांनी पक्ष सोडला तेव्हा आम्ही शरद पवारांसोबत उभे राहिलो, अनेकांचा विरोध सहन केला, सरकारविरोधात आंदोलन केली. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर झालेल्या टीकेला आम्ही उत्तर दिलं. आणि आता निवडणुका तोंडावर आल्यावर एकत्र लढण्याचा विचार कसा काय? अजित पवारांना माहीत आहे. एकत्र लढलो तर पुण्यात त्यांची किती जागा येऊ शकतात. असे म्हणत प्रशांत जगताप यांनी ठाम विरोध दर्शवला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.