मायलेज कमी होत असेल तर दरही कमी करा.
अरविंद केजरीवालांचे ई20 पेट्रोल प्रकरणी केंद्र सरकारला आवाहन
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आम आदमी पक्षाचे संयोजक आणि अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ई20 पेट्रोलचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. ई20 पेट्रोलमुळे मायलेज कमी होत असल्याने याचे दरही कमी केले जावेत, असे म्हणत केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे भेटीसाठी वेळ देण्याची मागणी केली आहे.
ई20 मुळे वाहनांचे मायलेज कमी होत असल्याने त्याचे दरही कमी केले जावेत अशी विनंती मी पंतप्रधान मोदींना केली आहे. ई20 बद्दल तक्रारी असणाऱ्या सर्व लोकांनी स्वत:चा व्हिडिओ तयार करत सोशल मीडियावर अपलोड करावा, कारण सरकार इतक्या सहजपणे आमचे म्हणणे ऐकून घेणार नाही, असा दावा केजरीवालांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींना पत्र
केजरीवालांनी ई20 इंधनावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले आहे. देशभरात लोकांच्या वाढत्या समस्येला अधोरेखित करत केजरीवालांनी दोन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकून घेतला जावा. पूर्ण देशात लोक ई20 पेट्रोलमुळे नाराज आहेत. ई20 भरल्यावर वाहनांचे मायलेज खूपच कमी झाले असून इंजिन पार्ट्स खराब होत असल्याचे वाहनमालकांचे सांगणे असल्याचा दावा केजरीवालांनी केला.
केजरीवालांच्या दोन प्रमुख मागण्या
- प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल (ई 0 किंवा ई 10) आणि ई 20 दोन्ही पर्याय उपलब्ध करण्यात यावेत, जेणेकरून ग्राहक स्वत:च्या पसंतीनुसार इंधन निवडू शकेल.
- ई 20 चा दर शुद्ध पेट्रोलपेक्षा कमी ठेवण्यात यावा, कारण यामुळे वाहनांचे मायलेज कमी होतेय.
Comments are closed.