मातृत्वाची ओढ आणि प्राण्यांच्या जगण्याचा संघर्ष; इफ्फीमध्ये ‘रहमा’ व ‘द फार्म’ चित्रपटांनी वेधले लक्ष – TMarathiNews

पणजी : मातृत्वाची ओढ, मानवी नात्यांमधील भावनिक गुंतागुंत आणि मुक्या प्राण्यांच्या जगण्याचा संघर्ष अशा संवेदनशील विषयांवर भाष्य करणाऱ्या ‘रहमा’ आणि ‘द फार्म’ या दोन आंतरराष्ट्रीय चित्रपटांनी 57 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून करुणा, सहानुभूती, मानवी असुरक्षितता आणि प्रत्येक जीवाच्या जगण्याच्या अधिकाराचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

या चित्रपटांशी संबंधित दिग्दर्शक आणि निर्मात्यांची पत्रकार परिषद गोव्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ‘रहमा’चे लेखक-दिग्दर्शक फैजल सोयसल, ‘द फार्म’च्या लेखिका-दिग्दर्शिका एलिफ एडा आणि छायाचित्रण दिग्दर्शक एम्रे पेक्काक उपस्थित होते. चित्रपटांच्या संकल्पना, निर्मितीमागील प्रेरणा आणि चित्रीकरणातील अनुभव याविषयी त्यांनी माहिती दिली. या सत्राचे सूत्रसंचालन शिल्पा निळकंठ यांनी केले.

‘रहमा’ : मातृत्वाच्या ओढीतून उमलणारे अनोखे नाते

फैजल सोयसल लिखित आणि दिग्दर्शित ‘रहमा’ हा चित्रपट मरियम नावाच्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ महिलेची कथा सांगतो. अनेक शस्त्रक्रिया आणि आयव्हीएफ उपचारांनंतरही आई होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यामुळे ती सरोगसीचा पर्याय स्वीकारण्याचा विचार करते. मात्र, तिच्या आयुष्यात रहमा नावाच्या नऊ वर्षीय सिरियन मुलीची भेट झाल्यानंतर अनपेक्षित बदल घडतात.

स्वतःच्या बळावर जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या रहमाची परिस्थिती समजल्यानंतर मरियम आणि तिच्यामध्ये भावनिक नाते निर्माण होते. या नात्यातून मरियमच्या आयुष्याला नवा अर्थ मिळतो आणि तिच्या भावनिक संघर्षातून सावरण्याचा प्रवास सुरू होतो.

या चित्रपटाच्या प्रेरणेबद्दल बोलताना फैजल सोयसल यांनी सांगितले की, स्वतःचे मूल होण्यासाठी संघर्ष करणारी जोडपी आणि कुटुंबाच्या आधाराविना वाढणारी मुले या दोन वास्तवांचा विचार करताना या कथेची कल्पना सुचली. पालकत्व म्हणजे केवळ जैविक नाते नसून प्रेम, आपुलकी आणि भावनिक जिव्हाळ्यातूनही कुटुंब निर्माण होऊ शकते, हा विचार चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

‘द फार्म’ : मुक्या प्राण्यांच्या वेदनांना चित्रपटातून वाचा

एलिफ एडा लिखित आणि दिग्दर्शित ‘द फार्म’ हा चित्रपट 12 वर्षीय इरेम या मुलीच्या संघर्षाची कथा मांडतो. आई-वडिलांच्या अचानक निधनानंतर ती आपल्या दुरावलेल्या आजीसोबत एका दुग्धशाळेत राहायला जाते. तेथे दूध उत्पादन वाढवण्यासाठी नवजात वासरांना त्यांच्या आईपासून वेगळे करण्याची प्रथा पाहून ती अस्वस्थ होते.

या मुक्या प्राण्यांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय इरेम घेते. दुग्धशाळेत पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे शिकाऊ म्हणून काम करणाऱ्या हलिद या अनाथ मुलाच्या मदतीने ती गाभण गायींची सुटका करण्यासाठी मोहीम सुरू करते. प्राण्यांच्या वेदना, त्यांच्या जगण्याचा अधिकार आणि मानवी हस्तक्षेपाचे परिणाम या विषयांवर चित्रपट भाष्य करतो.

चित्रपटाच्या संकल्पनेविषयी बोलताना एलिफ एडा म्हणाल्या की, प्रत्येक सजीवाच्या जीवनाचा आदर करणे आणि इतरांच्या दुःखाबद्दल संवेदनशील राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवाची प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती अनेकदा इतर सजीवांच्या वेदनांना कारणीभूत ठरते. खरा धोका केवळ वेदना सहन करण्यात नसून, इतरांना होणाऱ्या वेदनांबद्दल संवेदनाहीन होण्यात आहे. प्राण्यांच्या दुर्लक्षित वेदनांना चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.

चित्रपटसृष्टीत महिला दिग्दर्शक म्हणून काम करताना आलेल्या आव्हानांचाही त्यांनी उल्लेख केला. महिलांना आपल्या सर्जनशील क्षमतेला वाव देण्यासाठी अनेक अतिरिक्त अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्राण्यांसोबत चित्रीकरणाचा वेगळा अनुभव

‘द फार्म’चे छायाचित्रण दिग्दर्शक एम्रे पेक्काक यांनी चित्रीकरणादरम्यान आलेल्या अनुभवांची माहिती दिली. गायींचे चित्रीकरण करणे हे तांत्रिकदृष्ट्या वेगळे आव्हान होते. त्यासाठी त्यांनी फार्मवर बराच वेळ घालवून प्राण्यांच्या हालचाली, स्वभाव आणि वातावरणाचे बारकाईने निरीक्षण केले. काही अडचणी आल्या, तरी प्राण्यांच्या सान्निध्यात चित्रीकरण करण्याचा अनुभव आनंददायी आणि समृद्ध करणारा ठरल्याचे त्यांनी सांगितले.

‘रहमा’ आणि ‘द फार्म’ हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले, तरी त्यांचा केंद्रबिंदू करुणा, आपुलकी आणि सहानुभूती हाच आहे. स्वतःच्या अनुभवविश्वापलीकडे जाऊन इतरांच्या वेदना, भावना आणि संघर्ष समजून घेण्याची प्रेरणा हे चित्रपट देतात. 57 व्या इफ्फीमधील या चित्रपटांच्या सादरीकरणातून मानवी नात्यांसह संपूर्ण जीवसृष्टीविषयी संवेदनशील दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश देण्यात आला.

Comments are closed.