आठवड्याभरात मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार; उत्तरेकडील वाटचालीला वेग
अनेक दिवसांची प्रतीक्षा करायला लावणाऱ्या मॉन्सूनने आता राज्यात अनेक ठिकाणी बरसायला सुरुवात केली आहे. कोकण, मुंबई, ठाणे, पालघरसह अनेक जिल्ह्यात सोमवारी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. आता हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आठवड्याभरात मॉन्सून महाराष्ट्र व्यापणार असून त्याच्या उत्तरेकडील वाटचालीला वेग आला आहे. 26 जूननंतर मॉन्सून वेग धरणार असून त्याची उत्तरेकडील वाटचाल जोमाने होण्याची शक्यता आहे.
देशात मॉन्सून आता जोर धरत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच दिल्लीसह उत्तर हिंदुस्थानात पोहोचू शकतो. राजधानी दिल्लीत जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार २५-२६ जूनच्या सुमारास बंगालच्या उपसागरात एक अनुकूल प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मॉन्सूनची वाटाल वेगाने होणार असून जूलैच्या पहिल्या आठवड्यात तो दिल्लीत पोहोचू शकतो.
हवामान खात्याने सांगितले की, २३ जूनपासून नैऋत्य मॉन्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. मॉन्सून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिल्लीत पोहोचू शकतो. तथापि, दिल्लीत मान्सून येण्याची सामान्य तारीख २६-२७ जून आहे. म्हणजेच दिल्लीत मॉन्सून नेहमीपेक्षा सुमारे एक आठवडा उशिरा दाखल होणार आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, २३ जून २०२६ च्या सुमारास मॉन्सून महाराष्ट्र, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहारचा अधिक भाग आणि छत्तीसगडच्या काही भागांमध्ये पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे. ईशान्य हिंदुस्थानसाठी २५ जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Comments are closed.