‘कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक…’, वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने म

वाशिम : वाशिममध्ये गोगरी परिसरात मनरेगा योजनेच्या अंतर्गत संत्रा फळबागेचे अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याबाबत शेतकऱ्याला तालुका कृषी अधिकाऱ्याने बुटाने व मातीच्या ढेकळाने मारहाण (Washim Farmer News) केल्याचा संतापजनक व्हिडीओ व्हायरल (Washim Farmer News) झाला आहे. या घटनेनंतर आता राजकीय नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त करत त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट शेअर केली आहे. या अन्यायकारी अन्नदात्याविरोधी फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो. या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे, असंही नाना पटोलेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Nana Patole On Washim News: नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी आपल्या तीन एकर शेतीत दोन वर्षापूर्वी मनरेगा योजनेंतर्गत  संत्रा फळबाग लावली होती. या फळबागेसाठी शासनाकडून मिळणारे अनुदान चार महिन्यांपासून रखडल्याचं त्यांचं म्हणण आहे. यादरम्यान, मंगरुळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे हे गोगरी शिवारात पाहणी करण्यासाठी गेले असता, पवार यांनी त्यांच्याकडे रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. आरोपानुसार, जाब विचारत असताना तालुका कृषी अधिकाऱ्याने शेतकऱ्याच्या अंगावर धाव घेत चक्क बुटाने मारहाण केली. याशिवाय, शेतातील मातीची ढेकळे उचलूनही पवार यांना मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.(Washim Farmer News)

Nana Patole On Washim News: नाना पटोलेंनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेस नेते आणि आमदार नाना पटोले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “देवेंद्र फडणवीस यांचे सरकार शेतकरीविरोधी आहे. राज्याचे कृषिमंत्री म्हणतात, भिकारी सुद्धा एक रुपयाची भीक घेत नाही, पण एक रुपयात विमा सरकार देते; दुसरे आमदार म्हणतात, शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल आम्ही देतो आणि मुजोर सरकारी अधिकारी शेतकऱ्यांच्या अंगावर धावून जात बुटाने मारहाण करतात. वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजनेअंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला झालेली मारहाण ही अत्यंत संतापजनक घटना आहे.”

“मंगळूरपीर येथील तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी शिवारात पाहणीसाठी गेला असता, पवार या शेतकरी बांधवाने त्यांच्या रखडलेल्या अनुदानाबाबत विचारणा केली. मात्र जाब विचारण्याऐवजी संबंधित कृषी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करत थेट शेतकऱ्याच्या अंगावर धावत जाऊन त्या शेतकऱ्याला बुटाने मारहाण केली तसेच शेतातील मातीची ढेकळे उचलून त्याच्यावर फेकली. इतक्यावरच न थांबता या मुजोर अधिकाऱ्याने शेतकऱ्याला “तुला गुन्ह्यात अडकवीन” अशी धमकी देत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही घटना संपूर्ण शेतकरी वर्गाच्या स्वाभिमानावर केलेला हल्ला आहे. या राज्यात शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे, असा गंभीर प्रश्न आज निर्माण झाला आहे. एकीकडे अस्मानी संकट, दुसरीकडे सुलतानी संकट आणि त्यात भर म्हणून प्रशासनातील काही मुजोर अधिकाऱ्यांची अरेरावी या सगळ्या गोष्टींमुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. कृषीप्रधान भारत देशात जर शेतकऱ्यांना अशी अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत असेल तर शेतकऱ्यांनी न्यायासाठी जायचे तरी कुठे, हा प्रश्न उपस्थित होतो. या अन्यायकारी अन्नदात्याविरोधी फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो. या शेतकऱ्याला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे.”

आणखी वाचा

Comments are closed.