इंटेंट कायम ठेव, बाकी मी बघून घेईन…, गौतम गंभीरच्या एका वाक्यानं रिंकू सिंग पेटून उठला, सामना

रिंकू सिंग इंड विरुद्ध न्यूझीलंड पहिला T20 : भारताने पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा 48 धावांनी पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. बुधवारी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. अभिषेक शर्माच्या वादळी 84 धावांच्या खेळीसह रिंकू सिंगच्या नाबाद 44 धावांच्या योगदानामुळे भारताने 20 षटकांत 7 बाद 238 धावा फटकावल्या. कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 7 बाद 190 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

दरम्यान, सामन्यानंतर बोलताना रिंकूने आपल्या कामगिरीचे श्रेय टीम इंडियाचे प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांना दिले आहे. “संघात आत-बाहेर होत असल्यामुळे माझ्यावर थोडं दडपण होतं, पण गंभीर सरांनी दिलेल्या एका सल्ल्याने माझा आत्मविश्वास वाढवला,” असे रिंकूने स्पष्ट केले.

गौतम गंभीरचा महत्त्वाचा सल्ला

रिंकू सिंगने सांगितले की, फलंदाजीला जाण्यापूर्वी गौतम गंभीर यांनी फक्त इंटेंट कायम ठेवण्यास सांगितले होते. “मैदानावर गेल्यावर सुरुवातीला एकेरी धावा काढायच्या आणि त्यानंतर मोठे फटके मारायचे, असा माझा प्लॅन होता. शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहणे महत्त्वाचे होते आणि मी तेच केले,” असे रिंकू म्हणाला.

अर्शदीप सिंगसोबतची ती मजेशीर चर्चा

सामन्याच्या शेवटच्या षटकांमध्ये अर्शदीप सिंगसोबत झालेल्या संवादाबद्दल रिंकूने खुलासा केला. अर्शदीपने काही चेंडू डॉट खेळल्यानंतर रिंकू त्याला काय म्हणाला? यावर तो हसून म्हणाला, “काही विशेष नाही, मी त्याला फक्त शांत राहून एक धाव काढायला सांगितली जेणेकरून स्ट्राईक माझ्याकडे येईल. कधीकधी चेंडू बॅटला लागत नाहीत, त्यात काही हरकत नाही.”

कॅच सुटला, पण खचलो नाही…

क्षेत्ररक्षणादरम्यान सुटलेल्या कॅचवर बोलताना रिंकूने कबुली दिली. तो म्हणाला, “फ्लडलाईट्सची कोणतीही अडचण नव्हती, माझ्याकडून तो कॅच चुकून सुटला. पण अशा गोष्टी होत राहतात, त्यावर जास्त चिंता करण्याची गरज नाही. आम्हाला हाच आत्मविश्वास आणि गती आगामी विश्वचषकापर्यंत टिकवून ठेवायची आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट विश्वचषक जिंकणे हेच आहे,” असा ठाम विश्वासही रिंकूने यावेळी व्यक्त केला.

हे ही वाचा –

Axar Patel News : वर्ल्डकपआधी टीम इंडियाला 440 व्होल्टचा धक्का! उपकर्णधारला दुखापत, रक्तबंबाळ अवस्थेत सोडलं मैदान; अक्षर पटेलसोबत नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.