IND Vs SL दुसरी कसोटी – एका सामन्यात दुहेरी धमाका! सोनल दिनुषची ऐतिहासिक थप्पड

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यामध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या सोनल दिनुषाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. संघ अडचणीत असताना त्याने दोन्ही डावात एकाकी झुंज देत शतक ठोकलं आहे. विशेष म्हणजे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर येत शतक झळकावण्याचा भीम पराक्रम त्याने केला आहे. एकीकडे हिंदुस्थानच्या घातक माऱ्यापुढे श्रीलंकेचे फलंदाज अपयशी ठरले. अशा परिस्थितीत सोनलची ही धडाकेबाज खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली.

सोनल दिनुषाने पहिल्या डावात सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 162 चेंडूंत 8 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 196 चेंडूंमध्ये 6 चौकारांच्या मदतीने शतक ठोकलं. त्याच्या या विक्रमी कामगिरीसह एकाच कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो जगातील 12 वा फलंदाज ठरला आहे. तसेच हिंदुस्थानविरुद्ध असा पराक्रमक करणारा तो सहाव्या किंवा त्यापेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी करणारा जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. या सामन्यात श्रीलंकेची स्थिती अत्यंत बिकट असताना सोनलच्या या जागतिक दर्जाच्या खेळीने संघाचा पराभव टाळण्यास मोलाची मदत केली.

हिंदुस्थानविरुद्ध कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत शतक झळकावण्याच्या या एलिट क्लबमध्ये आता सोनल दिनुषाचे नाव जोडले गेले आहे. यापूर्वी सर डॉन ब्रॅडमन, ग्रॅम गूच, सुनील गावसकर आणि जॅक कॅलिस यांसारख्या महान खेळाडूंनी हा विक्रम केला होता. या दोन सामन्यांच्या मालिकेत अप्रतिम फॉर्म दाखवत सोनलने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या नावावर नवा जागतिक विक्रम नोंदवला आहे. दरम्यान, 150 षटकांचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात 9 गड्यांच्या मोबदल्यात 411 धावा केल्या आहेत. सोनल दिनुषा सध्या फलंदाजी करत असून त्याने 250 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 1 षटकारांच्या मदतीने 121 धावा केल्या आहेत. तर श्रीलंकेने 200 हून अधिक धावांची आघाडी घेतली आहे.

Comments are closed.