Colombo: भारताविरुद्ध कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘असे’ घडले, सोनल-केशरा यांनी रचला इतिहास

कोलंबो येथे भारत आणि श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. पाचव्या दिवसाचा (27 ऑगस्ट) खेळ सुरू झाला असता. केशरा नुवांथा आणि सोनल दिनुशा यांनी भारताच्या नाकीनऊ आणले. दोघांनी संयमी खेळी करत अनेक उत्तम शॉट्स खेळले आणि श्रीलंकेचा धावफलक हलता ठेवला.

श्रीलंकेचा पहिल्या डाव 290 धावसंख्येवर संपुष्टात आल्याने भारताने त्यांना फॉलो-ऑन दिला आणि श्रीलंकेने चौथ्या दिवसाचा खेळ संपला असता 16 धावांची आघाडी घेत 6 विकेट्स गमावल्या. त्यामुळे भारत पाचव्या दिवशी श्रीलंकेला बाद करत छोटे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नात होता, मात्र भारताच्या या आशेवर दिनुशा आणि नुवांथा यांनी पाणी फेरले. दोघांनी ऐतिहासिक खेळी करत श्रीलंकेच्या आघाडीमध्ये आणखी भर टाकली.

दिनुशा या मालिकेत भलताच फॉर्ममध्ये आहे. त्याने चौथे अर्धशतक केले. त्याने पहिल्या कसोटीत 100, 84 आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात 103 धावा केल्या आणि दुसऱ्या डावात आणखी एक अर्धशतक केले. त्याचबरोबर त्याने लंच ब्रेकपर्यंत केशरासोबत शतकी भागीदारी करत श्रीलंकेची आघाडी 116 धावांपर्यंत वाढवली होती. दोघांनी पहिल्या सत्रात एकही विकेट न गमावता 100 धावा जोडल्या.

भारताविरुद्ध दिनुशा-केशरा यांची ऐतिहासिक खेळी
सोनल दिनुशा आणि केशरा नुवांथा यांनी भारताविरुद्ध शतकी भागीदारी करून इतिहास रचला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात फॉलो-ऑन दिल्यानंतर सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठी शतकी भागीदारी होण्याची ही 13 वी वेळ आहे, तर भारताविरुद्ध हे पहिल्यांदाच घडले आहे.

याआधी भारताविरुद्ध फॉलो-ऑन दिल्यानंतर सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी नाबाद 98 धावांची होती, जी 2000 मध्ये नागपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऍंडी फ्लॉवर आणि हीथ स्ट्रीक यांनी केली होती.

श्रीलंकेच्या जोडीचे आणखी काही विक्रम
कसोटी सामन्यांमध्ये फॉलो-ऑन दिल्यानंतर सातव्या किंवा त्यापेक्षा खालच्या विकेटसाठीची भागीदारी (श्रीलंका)
137 – रोमेश कालुविथराना आणि चामिंडा वास विरुद्ध न्यूझीलंड (ड्युनेडिन, 1997)
116 – दिनेश चंडीमल आणि रंगना हेरथ विरुद्ध इंग्लंड (चेस्टर-ले-स्ट्रीट, 2016)
111* – सोनल दिनुषा आणि केशरा नुवंता विरुद्ध भारत कोलंबो SSC, 2026)
105 – चामिंडा वास आणि नुवान कुलसेकरा विरुद्ध इंग्लंड (लॉर्ड्स, 2006)

Comments are closed.